संसदेच्या आवारात आणि लोकसभेच्या सभागृहात धूर पसरवत गोंधळ घालणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसंच हे आरोपी ज्या दाम्पत्याकडे राहिले होते त्यांनाही पोलिसांनी अटक केली. यानंतर या कटाचा मास्टरमाईंड ललित झा हा फरार होता. त्याने पोलिसांसमोर गुरुवारी उशिरा आत्मसमर्पण केलं. त्यानंतर आज ललितला पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने स्वतःच आपण या कटाचा सूत्रधार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच या प्रकरणी आता त्याची कसून चौकशी केली जाणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांनी काय मागणी केली होती?
दिल्ली पोलिसांनी कोर्टाकडे ललित झा याला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जावी अशी मागणी केली होती मात्र त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायमूर्ती डॉ. हरदीप पुरी यांनी आरोपी ललित झा याला विचारलं की तुझ्याकडे वकील आहे का? त्यावर त्याने नाही असं उत्तर दिलं. संसदेत गदारोळ घालून धूर पसरवणारे सागर शर्मा, मनोरंजन डी, नीलम आजाद आणि अमोल शिंदे यांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी गुरुवारी सुनावण्यात आली. पोलिसांनी चौकशीसाठी यांनाही पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली जावी अशी मागणी केली होती.
काय घडलं होतं बुधवारी?
बुधवारी लोकसभेत शून्य प्रहर संपण्यासाठी काही मिनिटं उरलेली असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन युवकांनी सदनात उड्या मारल्या आणि त्यांच्याकडे असलेल्या कॅनमधून पिवळ धूर संसदेत पसरवला. यामुळे एकच गदारोळ झाला. यावेळी या दोघांना तिथे असलेल्या खासदारांनी पकडलं आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या दोघांसह बाहेर घोषणाबाजी करुन धूर पसरवणाऱ्या दोघांनाही अटक केली. या चौघांनाही आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर रात्री उशिरा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ललित झा याने पोलिसांसमोर येत शरणागती पत्करली. त्यालाही आता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात विक्की शर्मा आणि त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे. कारण गदारोळ माजवणारे हे सगळेजण या दोघांच्या घरी राहिले होते. ललित झा हा मूळचा बिहारचा राहणारा आहे. मात्र कोलकाता या ठिकाणी नोकरी करतो. पोलिसांचं म्हणणं आहे की ललित झा याच्यावर भगतसिंग यांच्या विचारांचा प्रभाव आहे. ललित कोलकाता येथील ज्या एनजीओसाठी काम करतो त्या एनजीओचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसंच ललित झा ने एनजीओचे संस्थापक निलाक्ष यांना संसदेत मोबाईल कॅमेरावर चित्रीत केलेला व्हिडीओ पाठवला होता. पोलिसांनी यासंदर्भात निलाक्ष यांनाही संपर्क केला आहे.