आज लोकसभेत एक धक्कादायक घटना घडली. हिवाळी अधिवेशनाचा शून्य प्रहर संपण्याच्या काही मिनिटं आधी दोन तरुणांनी अचानक लोकसभेत एका बेंचवरुन दुसरीकडे उड्या मारल्या आणि पिवळ्या रंगाचा धूर स्मोक कॅनमधून सगळीकडे पसरवला. या घटनेमुळे सगळीकडे एकच हलकल्लोळ उडाला सगळे खासदार बाहेर निघून गेले आणि संसदेचं कामकाजही तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. या सगळ्या प्रकारादरम्यान संसदेच्या बाहेर एक महिला घोषणाबाजी करत होती. या महिलेचं नाव आता समोर आलं आहे. तसंच तिने या घोषणा आणि गुलाबी रंगाचा धूर का पसरवला ते देखील तिनेच सांगितलं आहे.
कोण आहे संसदेबाहेर घोषणा देणारी महिला?
संसदेबाहेर घोषणा देणाऱ्या महिलेचं नाव नीलम असं आहे. तर तिच्या सहकाऱ्याचं नाव अनमोल शिंदे आहे. नीलम ही ४२ वर्षांची आहे. तर हरियाणातल्या हिसार या ठिकाणी ती राहणारी आहे. पोलिसांनी नीलम आणि अनमोल या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. त्यांना संसद भवन पोलीस ठाण्यात आणलं गेलं आहे. दिल्ली पोलीस आणि इंटेलिजन्स ब्युरो यांच्यातर्फे या दोघांची चौकशी करण्यात येते आहे.
नीलम काय घोषणा देत होती?
‘तानाशाही नहीं चलेगी’, ‘महिलांओपर अत्याचार नहीं चलेगा’, जय भीम!, जय भारत या घोषणा ही तरुणी देत होती. तसंच तिला अटक करुन घेऊन जात असताना तिने सांगितलं माझं नाव नीलम आहे. मी सामान्य जनतेचा आवाज उठवण्यासाठी इथे आले आहे. भारत सरकार आमच्यावर अत्याचार करतं आहे. लाठीचार्ज केला जातो, टॉर्चर केलं जातं त्यामुळे मी घोषणाबाजी केली. मी कुठल्याही संघटनेशी संबंधित नाही. मी तुमच्यासारखीच सामान्य नागरिक आहे. युवक बेरोजगार आहेत, आमचा आवाज दाबला जातो आहे. छोटे दुकानदार, शेतकरी यांचं नुकसान होतं आहे तरीही सरकार काहीच करत नाही. हे चालणार नाही. त्यामुळेच मी आंदोलन केलं आणि घोषणा दिल्या असं या तरुणीने सांगितलं आहे.
काय म्हणाले ओम बिर्ला?
“लोकसभेत शून्य प्रहरात जी घटना घडली होती त्याबाबत आपल्या सगळ्यांनाच चिंता होती आणि आहे. लोकसभा या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी करते आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांनाही आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपल्या सगळ्यांना जी चिंता वाटत होती की ज्या धुराचे लोट पसरवण्यात आले तो धूर नेमका काय होता? प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की तो धूर सर्वसाधारण धुराप्रमाणेच होता. फक्त काहीतरी गदारोळ घडला पाहिजे या उद्देशाने या धुराचे लोट पसरवले गेले. तो धूर हा चिंतेचा विषय नाही, प्राथमिक चौकशीच्या नंतरच मी हे आपणाला सांगतो आहे.” असं ओम बिर्ला यांनी स्पष्ट केलं.
आज संसदेवरच्या हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच दिवशी दोन तरुण लोकसभेत शिरले होते. त्यांनी लोकसभेत पिवळ्या धुराचे लोट पसरवले. यानंतर लोकसभेत एकच गदारोळ झाला. खासदारांनी अत्यंत हिंमतीने या दोघांनाही पकडलं आणि सुरक्षा दलांच्या ताब्यात दिलं. या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांची आता चौकशी सुरु आहे. सुरक्षेचा इतका कठोर बंदोबस्त असताना पिवळ्या धुराचे कॅन घेऊन हे दोन तरुण आत कसे काय शिरले? याविषयी प्रश्न निर्माण होतो आहे.