Parliament Breached : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसमांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत दोन व्यक्ती लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी त्यांच्या हातात दोन कॅन होते, ज्यातून पिवळा धूर निघत होता. खासदारांनीच या दोघांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता या संबंधी एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. घुसखोरांना खासदारांनी पकडल्यानंतर चांगलेच चोपले असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुरक्षा रक्षकांनी या घुसखोरांना ताब्यात घेईपर्यंत खासदारांनी त्यांची चांगलीच धुलाई केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी अतिरेकी हल्ला करण्यात आला होता. आज त्याचा २२ वर्धापन दिन साजरा होत असतानाच थेट लोकसभा सभागृहात घुसखोरी झाल्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. एक्स या सोशल साईटवर अनेकांनी सदर व्हिडिओ शेअर केला आहे. निवृत्त सनदी अधिकारी सुर्या प्रताप सिंह यांनीही या व्हिडिओला त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे.
या दोन्ही घुसखोरांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सुरक्षेचा इतका काटेकोर बंदोबस्त असताना पिवळ्या धुराचे कॅन घेऊन हे दोन तरुण आत कसे काय शिरले? याविषयी प्रश्न सुरुवातीला निर्माण झाला होता. पण कालांतराने लक्षातआले की, म्हैसूरमधील भाजपा खासदार प्रताम सिंह यांच्या व्हिजिटर पासच्या आधारावर हे दोन घुसखोर प्रेक्षक गॅलरीपर्यंत आले होते. आता प्रताप सिंह यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसने सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत केली आहे.
काय म्हणाले लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला?
“लोकसभेत शून्य प्रहरात जी घटना घडली होती त्याबाबत आपल्या सगळ्यांनाच चिंता होती आणि आहे. लोकसभा या घटनेची संपूर्ण सखोल चौकशी करते आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांनाही आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आपल्या सगळ्यांना जी चिंता वाटत होती की ज्या धुराचे लोट पसरवण्यात आले तो धूर नेमका काय होता? प्राथमिक तपासात हे समोर आलं आहे की तो धूर सर्वसाधारण धुराप्रमाणेच होता. फक्त काहीतरी गदारोळ घडला पाहिजे या उद्देशाने या धुराचे लोट पसरवले गेले. तो धूर हा चिंतेचा विषय नाही, प्राथमिक चौकशीच्या नंतरच मी हे आपणाला सांगतो आहे.” असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले.
प्रत्यक्षदर्शी खासदारांकडून माहिती घ्या
काँग्रेसचे खासदार गौरव गोगाई म्हणाले, “ज्या खासदारांनी या युवकांना पकडले, त्यांना दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलवावे. त्यांच्याकडून माहिती घ्यावी. पण या खासदारांना बोलावले जात नाही. सरकार या घुसखोरीला दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आमची इच्छा आहे की, पोलिसांनी सखोल चौकशी करावी. ज्या खासदारांनी तरुणांना पकडले त्यांच्याकडून माहिती घ्यावी. तसेच नवीन संसद बनविल्यापासून काय काय हलगर्जीपणा होतोय, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यावरून याची चौकशी झाली पाहीजे.”