Lok Sabha Session Updates : देशात नवं सरकार स्थापन होऊन १८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे. आज संसदीय अधिवेशनाचा पाचवा दिवस असून भाजपा नेते आणि माजी मंत्री अनुराग ठाकूर लोकसभेतील चर्चेला सुरुवात करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावार आज चर्चा केली जाईल. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै रोजी उत्तर देतील. तर भाजपा नेते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी हे राज्यसभेतील आभार प्रस्तावावर चर्चेस सुरुवात करतील. संसदेच्या या वरिष्ठ सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ जुलै रोजी उत्तर देणार आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात काय घडतंय यावर आपलं लक्ष असेल. येथे घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Parliament Session Updates, 28 June 2024 : लोकसभा आणि राज्यसभेत घडणाऱ्या घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर

17:53 (IST) 28 Jun 2024
‘नीट’चा मुद्दा उपस्थित करताच राहुल गांधींचा माईक केला बंद? काँग्रेसच्या दाव्यावर लोकसभा अध्यक्षांचंही उत्तर चर्चेत!

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते झाल्यापासून बरेच सक्रिय झाले आहेत. नवं सरकार स्थापन झाल्यापासून देशात नीट पेपरफुटीचं प्रकरण गाजतंय. हे प्रकरण थेट संसदेतही पोहोचलं आहे. याविषयी संसदेत प्रश्न मांडताना राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येतोय. यासंदर्भातील व्हीडिओच त्यांनी एक्स खात्यावरून शेअर केला आहे.

सविस्तर वृत्त वाचा

17:35 (IST) 28 Jun 2024
'NEET' प्रकरणावरून राज्यसभेत राडा, भोवळ आल्याने काँग्रेसची महिला खासदार कोसळली, स्ट्रेचरवरून न्यावं लागलं

लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही विरोधी पक्षांच्या खासदारांनी NEET पेपर लीक प्रकरणावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभागृहात गोषणाबाजी आणि गोंधळ सुरू झाला. दरम्यान, काँग्रेसच्या खासदार फूलो देवी नेताम यांना भोवळ आली आणि त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर त्यांच्यासाठी रुग्णवाहिक बोलावण्यात आली. वैद्यकीय पथकाने त्यांना स्ट्रेचरवरून सभागृहाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेत नेलं आणि तिथून त्याना रुग्णालयात नेण्यात आलं. आरएमएल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

https://twitter.com/ANI/status/1806619217015529516

14:37 (IST) 28 Jun 2024
"आजचा दिवस भरतीय संसदेच्या इतिहासातला काळा डाग बनलाय", सभापती असं का म्हणाले?

राज्यसभेत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा बोलत असतानाच विरोधकांकडून घोषणाबाजी होत होती. त्यानंतर सभापती जगदीप धनखड म्हणाले, आजचा दिवस भरतीय संसदेच्या इतिहासातला काळा डाग बनला आहे. विरोधी पक्षांचे नेते सभापतींच्या टेबलाजवळ आले. असं सभागृहात यापूर्वी कधी घडलं नव्हतं. हे पाहून मला खूप वेदना झाल्या आहेत. मला हे सगळं पाहून खूप आश्चर्य देखील वाटतंय. आपल्या संसदीय परंपरांचा, वरिष्ठ सभागृहातील सदस्यांच्या वागण्याचा स्तर इतका खाली कसा काय घसरू शकतो? असा मला प्रश्न पडला आहे. त्यामुळेच सभागृहाचं कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करत आहोत.

12:54 (IST) 28 Jun 2024
विरोधकांनी देशाची परिस्थिती समजून घ्यावी - देवेगौडा

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. देवेगौडा म्हणाले, नीट पेपर लीक प्रकरणाचा तपास चालू आहे. परंतु, विरोधकांनी देशाती परिस्थिती समजून घ्यावी.

12:47 (IST) 28 Jun 2024
विरोधकांच्या राज्यसभेत 'We Want Justice'च्या घोषणा

राज्यसभेत भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरी आभार प्रस्तावावर बोलू लागल्यावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी NEET प्रकरण लावून धरलं. तसेच 'We Want Justice'च्या घोषणा दिल्या

12:32 (IST) 28 Jun 2024
"देशभरातील विद्यार्थ्यांना संदेश जायला हवा...", राहुल गांधींनी 'NEET' पेपर लीक प्रकरण सभागृहात मांडलं

विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसभेत म्हणाले, NEET पेपर लीक प्रकरणावर सभागृहात चर्चा व्हायला हवी. सरकारने जनतेच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला हवीत आणि यावरील उपाययोजना सांगायला हव्यात. सभागृहातील चर्चेतून देशभरातील विद्यार्थ्यांना संयुक्त संदेश जायला हवा की विरोधक आणि सरकार या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहत आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की सभागृहात NEET पेपर लीक प्रकरणावर चर्चा व्हावी.

राहुल गांधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, प्रत्येक मुद्द्यावर सर्वांना बोलण्याची संधी मिळेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तवावर सर्वजण चर्चा करू शकतात. त्याचबरोबर मी सरकारला सांगेन की त्यांनी तुमच्या मुद्द्यावर उत्त द्यावं.

https://twitter.com/ANI/status/1806566284001468452

11:38 (IST) 28 Jun 2024
राज्यसभा तहकूब

राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चेचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर काही वेळाने विरोधकांनी NEET पेपर लीक प्रकरणावर चर्चेची मागणी केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये गोंधळ सुरू झाला. परिणामी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केलं.

11:34 (IST) 28 Jun 2024
NEET पेपर लीक प्रकरणावरून लोकसभेतं विरोधकांचा गोंधळ, लोकसभा तहकूब

शुक्रवारी (२८ जून) सकाळी ११ वाजता संसदेच्या पाचव्या दिवसाचं कामकाज सुरू झालं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावार चर्चा सुरू करण्यात आली. मात्र कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळाने विरोधकांनी NEET पेपर लीक प्रकरणावर चर्चेची मागणी केली. यावरून सभागृहात गोंधळ सुरू झाला. परिणामी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केलं आहे.

10:57 (IST) 28 Jun 2024
लोकसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार

लोकसभेचं पाचव्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेच्या आवारात पत्रकार परिषद घेणार आहेत. राहुल गाधी या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राहुल गांधी कदाचित NEET पेपर लीक प्रकरणावर भाष्य करू शकतात.

10:55 (IST) 28 Jun 2024
राज्यसभेत NEET पेपर लीक प्रकरणावरील चर्चेसाठी स्तगिती प्रस्ताव

काँग्रेस खासदार नसीर हुसैन आणि आययूएमएलचे खासदार अब्दुल वाहेब यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर चर्चेसाठी सभागृहात स्थगिती प्रस्ताव मांडला आहे.