Lok Sabha Session : अठराव्या लोकसभेचे पहिलेच अधिवेशन सुरू आहे. यंदा संसदेत विरोधकांचे संख्याबळ वाढल्यामुळे विरोधकांनी सरकारला घेरण्याची रणनीती आखल्याचे दिसते. काल (२५ जून) लोकसभा अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चर्चा फिस्कटल्यानंतर आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. एनडीएकडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून केरळमधील काँग्रेसचे खासदार के. सुरेश निवडणुकीसाठी उभे आहेत. विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसले तरी सरकारने उपाध्यक्ष देण्यास विरोध केल्यामुळे इंडिया आघाडीने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
Parliament Session LIVE Updates, 24 June 2024 | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे प्रत्येक अपडेट मिळवा एका क्लिकवर
ओम बिर्ला यांचं मी अभिनंदन करतो. दुसऱ्यांदा तुमची लोकसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. लोकसभा हे आपल्या देशातील जनतेचा आवाज आहे. तुम्ही त्यांचं प्रतिनिधीत्व करत आहात असं राहुल गांधी म्हणाले. सरकारकडे राजकीय अधिकार आहेत. मात्र विरोधी पक्षही भारताचा आवाज आहे असंही राहुल गांधी म्हणाले.
ओम बिर्ला यांची दुसऱ्यांच्या लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांनी तुमच्या पाच वर्षांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होईल असं म्हटलं आहे.
ओम बिर्ला यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला एनडीएमधील विविध पक्षांच्या १३ नेत्यांनी पाठिंबा दर्शविला.
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या उमेदवाराला तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा नसल्याची चर्चा होती. मात्र आज सकाळी के. सुरेश यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाने त्यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे.