Lok Sabha Session Updates : संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. आजही अधिवेशनात नीट परीक्षांसह आदी मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत विविध विषयांवर चर्चा होणार असून गोंधळाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकरणाव्यतिरिक्त विरोधक बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित करण्याची शक्यता आहे.

Live Updates

Parliament Session  Updates, 1 July 2024

19:56 (IST) 1 Jul 2024
श्रीकांत शिंदेंकडून लोकसभेतील पहिल्या भाषणाची सुरुवात पांडुरंगाच्या जयघोषणाने

शिवेसनेचे ( शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज १८ व्या लोकसभेतील पहिल्या केलं. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात पांडुरंगाच्या जयघोषणाने केली. तसेच त्यांनी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर कल्याणमधील जनतेचे आभारही मानले.

18:07 (IST) 1 Jul 2024
“केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं”, खासदार अमोल कोल्हेंची लोकसभेत मागणी

केंद्र सरकारने जाती आधारीत जनगणना करावी तसेच इतर समाजाच्या आरक्षणाला हात न लावता, मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत बोलताना केली.

17:18 (IST) 1 Jul 2024
मणिपूरच्या मुद्यांवरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

सध्या संसदेचं पावसाळी अधिवशेन सुरु आहे. या अधिवेशनात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. तसेच नोटबंदी, जीएसटी आणि मणिपूरच्या मुद्यांवरून राहुल गांधींनी सरकारवर हल्लाबोल केला.

16:27 (IST) 1 Jul 2024
“दहा वर्ष भाजपाने भीती पसरवण्याचं काम केलं”; राहुल गांधींची टीका

“मागच्या दहा वर्षांत लोकांना घाबरवणं, तुरुंगात टाकणं हे प्रकार सर्रास सुरु होते. जे लोक भाजपाच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधात ठरवून कारवाया झाल्या. मीडियाचा वापर करुन मलाही नावं ठेवण्यात आली. माझ्यासाठी गंमतशीर भाग होता तो म्हणजे ५५ तासांची ईडी चौकशी. कारण ती चौकशी संपल्यानंतर त्या अधिकाऱ्याने कॅमेरा बंद केला आणि मला म्हणाला राहुल तु्म्ही एखाद्या दगडासारखे इथे ५५ तास बसून आहात. अशा प्रकारचा राजकीय हल्ला केला जातो तेव्हा तुम्ही स्थितप्रज्ञ असावं लागतं”, असं राहुल गांधी म्हणाले.

15:43 (IST) 1 Jul 2024
“गुजरातमध्ये आम्ही तुमचा पराभव करू”, राहुल गांधींचं मोदींना आव्हान

लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मी गुजरातमधील कापड व्यापाऱ्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं की, अब्जाधीशांच्या मदतीसाठी नोटाबंदी आणि जीएसटी आणले होते. नरेंद्र मोदी हे अब्जाधीशांसाठी काम करतात. मात्र, गुजरातमध्ये आम्ही तुमचा पराभव केल्याशिवया राहणार नाहीत, लेहून घ्या, गुजरातमध्ये इंडिया आघाडी एनडीएचा पराभव करणार”, असं राहुल गांधी म्हणाले.

15:17 (IST) 1 Jul 2024
आमचं सरकार आल्यावर अग्निवीर बंद करणार, राहुल गांधींचं विधान

राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच अग्निवीर योजना लष्कराच्या विरोधात असून देशाच्या विरोधात आहे. ते तरुणांच्या विरोधात आहे. आमचे सरकार आल्यावर ही योजना बंद करू, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.

15:00 (IST) 1 Jul 2024
राहुल गांधींच्या वक्तव्याने लोकसभेत सत्ताधाऱ्यांचा गदारोळ

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून आज लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी भाषण केलं. यावेळी राहुल गांधी यांनी सत्ताधारी पक्षातील खासदारांवर टीका केली. राहुल गांधींच्या एका वक्तव्याने संसदेत गदारोळ झाला. “जे हिंदू आहेत ते हिंसा करत नाहीत. भाजपा हिंसा पसरवतं”, असं राहुल गांधींनी म्हटलं. यावर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी सुनावत तुम्ही विरोधी पक्षाचे नेते आहात. कोणत्याही धर्माबद्दल तुम्ही अशा कमेंट करू नका, असे आवाहन केले.

14:48 (IST) 1 Jul 2024
तपास यंत्रणांच्या माध्यमातून सरकारने माझ्यावर हल्ला केला, राहुल गांधींचा आरोप

राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले, “सरकारच्या सांगण्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांनीही माझ्यावर हल्ला केला. माझी ५५ तास चौकशी झाली. हे सर्व पंतप्रधानांच्या सांगण्यावरून घडले”, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.

14:24 (IST) 1 Jul 2024
लोकसभेत राहुल गांधींची जय संविधान म्हणत भाषणाची सुरुवात

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून आज लोकसभेत बोलताना राहुल गांधींनी जय संविधान म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली. राहुल गांधींनी विविध विषयांवरून केंद्र सरकारवर टीका केली.

https://platform.twitter.com/widgets.js
13:37 (IST) 1 Jul 2024
‘मोदी आता एनडीए सरकार म्हणातात’, मल्लिकार्जुन खरगेंचा खोचक टोला

पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षांत कधीही त्यांच्या सरकारला भाजपा सरकार म्हटले नाही. ते मोदींचे सरकार म्हणत राहिले. मात्र, आता ते त्यांच्या सरकारला एनडीए सरकार म्हणत आहेत, असा टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत बोलताना लगावला.

13:21 (IST) 1 Jul 2024
“आरएसएसची विचारधारा धोकादायक”; मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यसभेत हल्लाबोल

राज्यसभेत खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा देशासाठी घातक असल्याचे वर्णन केले. यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड म्हणाले, आरएसएस देशासाठी काम करते. यात चांगले लोक आहेत. त्यावर खर्गे म्हणाले की, आरएसएसची विचारधारा मनुवादी आहे. यावर जेपी नड्डा यांनी यांनी मल्लिकार्जुन खरगेंचं हे विधान राज्यसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. जगदीप धनखड यांनी त्यांच्या मागणीवरून कामकाजातून ते विधान काढून टाकले.

12:08 (IST) 1 Jul 2024
लोकसभेत नीट परीक्षेंसंदर्भात चर्चेला नकार दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला

लोकसभेत नीटवर चर्चेला लोकसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला आहे. नीटवर एकदिवसीय चर्चेसाठी राहुल गांधी यांनी मागणी केली होती. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने विरोधी विरोधी खासदारांनी लोकसभेतून सभात्याग केला.

11:47 (IST) 1 Jul 2024
“जय संविधान घोषणेला विरोध करणारे खासदार सभागृहात”, मल्लिकार्जुन खरगेंची टीका

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली. सरकारचे लोकांच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. जय संविधान या घोषणेला विरोध करणारे खासदार आणि पक्ष सभागृहात आहेत’, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत बोलताना केली.

11:26 (IST) 1 Jul 2024
माइक बंद केल्याच्या विरोधकांच्या आरोपावर लोकसभा अध्यक्षांचं स्पष्टीकरण

विरोधी पक्षांच्या नेत्यांचे माइक बंद करण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी संसदेत केला होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी त्यांचे माईक बंद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीही केला होता. यावर आता लोकसभा अध्यक्ष म्हणाले की, हे सर्व आरोप निराधार आहेत. कारण त्यावर सभापतींचे कोणतेही नियंत्रण नाही.

11:21 (IST) 1 Jul 2024
टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल लोकसभेच्या अध्यक्षांनी आनंद व्यक्त केला

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी टी-२० विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाबद्दल भारतीय संघाचे आणि कर्णधार रोहित शर्माचे अभिनंदन केले आहे.

10:53 (IST) 1 Jul 2024
लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी सपा खासदाराला आपचे समर्थन

आम आदमी पार्टीने उपसभापतीपदासाठी सपाचे फैजाबादचे खासदार अवधेश प्रसाद यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. अवधेश प्रसाद यांच्या नावावर काँग्रेस आणि टीएमसीचेही एकमत झाले असल्याचं बोललं जात आहे.

भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर चर्चेला सुरुवात करणार आहेत. या प्रस्तावाला बांसुरी स्वराज अनुमोदन देतील. आभार प्रस्तावावर चर्चेसाठी लोकसभेने १६ तास दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी चर्चेला उत्तर देतील. मात्र, विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी