मनमोहन सिंग सरकारला बाहेरून समर्थन देणाऱ्या समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी सातत्याने गोंधळ घालून आणलेल्या व्यत्ययामुळे अनुसूचित जाती व जमातीच्या कर्मचाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये बढतीत आरक्षणाची तरतूद असलेले घटनादुरुस्ती विधेयक गुरुवारी लोकसभेत संमत होऊ शकले नाही.
गुरुवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत संमत झालेल्या बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयकावर राज्यसभेने शिक्कामोर्तब केले. राज्यसभेने मंजूर केलेले बढतीतील आरक्षण विधेयक लोकसभेत अपयशी ठरल्याबद्दल बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मनमोहन सिंग सरकारवर खापर फोडले आहे. गुरुवारी अधिवेशनाच्या अंतिम दिवशी बढतीतील आरक्षण विधेयकाच्या विरोधात सप सदस्यांनी गोंधळ घालून लोकसभेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आणला. अध्यक्ष मीराकुमार यांनी चर्चा आणि मतदानाचे आवाहन करूनही गोंधळ आणि त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित होण्याचा प्रकार सुरुच राहिला. पाचवेळा कामकाज स्थगित होऊनही सप सदस्यांनी आक्रमक पवित्रा न सोडल्याने अखेर सायंकाळी साडेपाच वाजता लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले.   

Story img Loader