Lok Sabha Session Updates : देशात सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन झालं असून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून (२४ जून) सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभेत खासदारांना खासदाकीची शपथ दिली जात आहे. या सोहळ्याची चर्चा देशभरात होत आहे. दरम्यान, सभागृहात आणि सभागृहाबाहेर अनेक घटना घडल्याचं पाहायला मिळाली. अधिवेशन सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ससदेबाहेर हातात संविधानाच्या प्रती घेऊन घोषणाबाजी केली. तसेच आम्ही देशाची लोकशाही आणि संविधान टिकवून ठेवू असा विश्वास व्यक्त केला. भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा लोकशाही आणि संविधानाला धोका असल्याचं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांमधील सर्व खासदार संविधानाच्या प्रती घेऊन संसदेत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीची शपथ घेतली तेव्हा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींना संविधानाची प्रत दाखवली. खासदारांचा शपथविधी सुरू झाल्यानंतर लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांनी नरेंद्र मोदींना शपथ घेण्यासाठी पाचारण केलं. मोदी त्यांच्या बाकावरून उठून मंचाकडे जात असताना आणि शपथ घेत असताना राहुल गांधी यांनी हात उंचावून त्यांना संविधानाची प्रत दाखवली. राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाची संविधानाची मिनी कॉपी होती. मोदींची शपथ पूर्ण होईपर्यंत विरोधी पक्षांचे खासदारही त्यांना संविधानाची प्रत दाखवत होते.
तत्पूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह ‘इंडिया’च्या खासदारांनी संसदेबाहेर “आम्ही संविधानाचं रक्षण करणार” अशा घोषणा दिल्या. यावेळी राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोघे भारताच्या संविधानावर आक्रमण करत आहेत. आम्ही ते खपवून घेणार आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत संविधानाचं रक्षण करू.
भाजपा खासदार भर्तृहरी महताब यांनी मोदींना खासदारकीची शपथ दिली. त्यानंतर भाजपा खासदार राधा मोहन सिंह यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या पॅनेलमधील सदस्य म्हणून शपथ घेतली. भाजपा खासदार फग्गन सिंह कुलस्ते आणि राधा मोहन सिंह पुढील दोन दिवस सभागृहाच्या कामकाजात हंगामी अध्यक्षांची मदत करतील.
हे ही वाचा >> Parliament Session 2024 LIVE Updates : शिक्षणमंत्री शपथ घेण्यासाठी उभे राहिले अन् विरोधी पक्षांकडून ‘NEET…NEET…’ ची घोषणाबाजी
दरम्यान, सभागृहात जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला म्हणाले, सर्व विजयी खासदारांचं मी अभिनंदन करतो. मला आशा आहे की ही संसद लोकशाही टिकवेल. या निवडणुकीत जो तिरस्कार आणि घृणा समाजात पसरवली गेली होती ती नष्ट होईल, अशी मी अपेक्षा करतो. देशातलं सरकार कुबड्यांर आहे, तर त्यांच्यासमोर एक मजबूत विरोधी पक्ष उभा आहे.