सरकारी कर्मचाऱ्यांवर लावण्यात आलेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे ऑस्ट्रेलियाच्या राजकारणामध्ये मंगळवारी राजकीय भुकंप झाला. सध्या ऑस्ट्रेलियात सत्ता असणाऱ्या कनझर्व्हेटीव्ह सरकारमधील कर्मचाऱ्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडीओमध्ये हे कर्मचारी संसद भवनामध्येच अश्लील चाळे करताना दिसत आहेत. या नव्या वादामुळे स्कॉट मॉरिसन यांचं सरकार पुन्हा एकदा नव्या वादात सापडलं आहे.
पंतप्रधान मॉरिसन यांनाही या प्रकरणामुळे शर्मेने मान खाली घालावी लागली आहे. हा संपूर्ण प्रकार अपमानकारक आणि खूपच लज्जास्पद असल्याचं मत मंगळवारी या प्रकरणासंदर्भात बोलताना मॉरिसन यांनी व्यक्त केलं. एका जागल्याच्या (व्हिसल ब्लोअर) माध्यमातून हे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. मात्र त्यापूर्वीच हे व्हिडिओ आणि फोटो सत्तेत अशणाऱ्या सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुप चॅटवर शेअर करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणासंदर्भात सर्वात आधी माहिती ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र आणि चॅनल १० न्यूज फर्स्टने दिली होती.
संसद भवनामधील महिला खासदारांच्या कॅबीन्समध्ये हे कर्मचारी अश्लील चाळे करताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर माहिला खासदार आणि देशातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हे सर्व प्रकरण समोर आणण्याऱ्या व्यक्तीचं नाव टॉम असं असल्याची माहिती समोर आलीय. प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सरकारमधील कर्मचारी आणि खासदार अनेकदा संसदेमधील प्रार्थना घराचा चुकीच्या कामांसाठी वापर करायचे. तसेच संसद भवनामध्ये अनेकदा खासदारांसाठी देहव्यापार करणाऱ्यांनाही या ठिकाणी आणलं जायचं. प्रेयर रुम म्हणून संसदेमध्ये तयार करण्यात आलेल्या छोट्या खोल्यांमध्ये सरकारी कर्मचारी आणि खासदार अनेकदा सेक्सही करायचे असा दावा या व्यक्तीने केलाय. या व्हायरल व्हिडीओंमध्ये सरकारी कर्मचारी संसद भवनातील महिला खासदारांसाठी दिलेल्या केबिन्समध्ये जाऊन अश्लील चाळे करताना दिसत आहेत. एका व्हिडीओमध्ये कर्मचारी आधी महिला खासदार बसतात तो डेस्ट दाखवताना दिसतो आणि पुढच्या क्षणाला हा कर्मचारी त्या महिला खासदाराच्या केबिनमधील टेबलवर पडून अश्लील चाळे करताना दिसतो.
अनेकदा येथील कर्मचारी स्वत:चे नको त्या अवस्थेमधील फोटो काढून एकमेकांशी शेअरही करायचे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत एका व्यक्तीला निलंबित करण्यात आलं आहे. तसेच सरकारने या प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. महिलांशी संबंधित प्रकरणांच्या मंत्री मॅरिज पॅन यांनी ही घटना म्हणजे केवळ निराशा नसून त्याहून बरंच काही सुचित करणारी असल्याचं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणामध्ये सखोल चौकशीसंदर्भात सरकारकडून आदेश दिले जातील असा शब्द दिलाय.
कामाच्या ठिकाणी चुकीचं वर्तन करण्यावरुन ऑस्ट्रेलियन खासदारांवर झालेला हा पहिलाच आरोप नसून यापूर्वीही अशाप्रकारचे वाद झाले आहे. माजी सरकारी कर्मचारी अशणाऱ्या ब्रिटनी हिग्निसने २०१९ मध्ये एका सहकाऱ्याने संसद भवनातील कार्यालयात माझ्यावर बलात्कार केला होता, असा आरोप केलाय. या महिन्याच्या सुरुवातीलाच एटर्नी जनरल असणाऱ्या क्रिश्चियन पोर्टर यांच्यावरही आरोप झाले होते. १९८८ मध्ये एका १६ वर्षीय मुलीसोबत त्यांनी अश्लील चाळे केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे आरोप पोर्टर यांनी फेटाळून लावलेत. सतत होणाऱ्या आरोपांमुळे पंतप्रधान मॉरिसन यांच्यावरील दबाव वाढताना दिसत आहे.