Parliament Special Session Day 2 Updates, 19 September 2023 : गणेशोत्सवामुळे आजचा दिवस सामन्यांसाठी सुट्टीचा असला तरी देशाच्या राजकारणात हा दिवस महत्त्वाचा आहे. कारण केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाचा हा दुसरा दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत महिला आरक्षण विधेयक सादर करू शकतात. सोमवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकाला विरोधकांकडून विरोध होणार नाही, त्यामुळे या अधिवेशनात हे विधेयक मंजूर होऊ शकतं. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात गणेशोत्सवामुळे जल्लोषाचं वातावरण आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. गणेश चतुर्थीनिमित्त आज (१८ सप्टेंबर) सकाळपासूनच लोकांच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होऊ लागलं आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाचं आगमन कालपासूनच सुरू झालं आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पा लोकांच्या घरोघरी विराजमान झाला आहे. सार्वजनिक गणेशत्व मंडळांच्या मंडपांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना सुरू आहे.
महाराष्ट्रात गणरायाचं आगमन, दिल्लीत नव्या संसदेत विशेष अधिवेशन
गावकऱ्यांच्या एकजुटीचे प्रतीक आणि पोलिसांचा ताण कमी करणाऱ्या ‘एक गाव एक गणपती’ या अभियानाने जिल्हयात लोक चळवळीचे स्वरूप धारण केले आहे. यंदा तब्बल ३०८ गावांत एकाच गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
नवीन संसदेत पहिल्याच दिवशी मोदी सरकारने देशातील महिलांची दिशाभूल केली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण देताना ते वेगळ्या प्रवर्गातून देण्याची सरकारची भूमिका असल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र त्यानंतर काँग्रेसचे नेते जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे.
बंदोबस्तास असलेल्या अधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित जवानांना आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या.
मध्यरात्रीच्या सुमारास आईसह झोपलेल्या चिमुकलीच्या अंगावर घराच्या आड्यावरून जात असलेला साप पडला. सापाने चिमुकलीच्या करंगळीला चावा घेतल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात नागपूर विभागातील ७ हजार ७८ गावांपैकी आतापर्यंत ४ हजार ४५५ गावांमधून अमृत कलश तालुक्याला पाठवण्यात आला आहे. उर्वरित २,५२३ गावांमधून येणाऱ्या कलशांची प्रतीक्षा प्रशासनाला आहे.
विहिघर, चिंध्रण, पोयंजे आणि आकुर्ली या गावांमधील हे गृहप्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून या प्रकल्पातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी ७ आणि अल्प उत्पन्न गटांसाठी १६४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत आणि विधानसभेत आरक्षण देणारं नारी शक्ती वंदन अधिनियम हे विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेत सादर केलं. त्यावर काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी या अधिनियमात ओबीसी महिलांना अरक्षण द्यावं अशी मागणी केली. खरगे म्हणाले दुर्बल घटकांमधील महिलांशी भेदभाव केला जातो. त्यामुळे ओबीसी वर्गातील महिलांना यामध्ये आरक्षण द्यायला हवं. खरगेंच्या मागणीने राज्यसभेत गदारोळ झाला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येत असलेल्या ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमात नागपूर विभागातील ७ हजार ७८ गावांपैकी आतापर्यंत ४ हजार ४५५ गावांमधून अमृत कलश तालुक्याला पाठवण्यात आला आहे. उर्वरित २,५२३ गावांमधून येणाऱ्या कलशांची प्रतीक्षा प्रशासनाला आहे.
तिघेही घुसखोरी करुन भारतात आले आहेत. त्यांनी कोलकत्ता येथून नऊ महिन्यांपूर्वी बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड बनविले होते.
अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी झारखंडमध्ये कुर्मी समाज संघटनांनी बुधवारी २० सप्टेंबर रोजी ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून काही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
तपासयंत्रणेत गांभीर्य नसल्याचा फायदा आरोपींच्या वकिलांनी घेतला आणि अटी व शर्तींवर आरोपींना जामीन मिळाला.
एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीने पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या परीक्षांबाबत देशभरातील विद्यार्थ्यांना उत्सुकता लागून राहलेली असते. देशातील आयआयटी प्रवेशासाठी जे ई ई परीक्षा सर्वात महत्वाची असते.
देशभरात सोमवारपासून ज्या विधेयकाची चर्चा सुरू आहे ते महिला आरक्षण विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ सप्टेंबर) लोकसभेत मांडलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण सगळ्यांनी नवा इतिहास रचला आहे. असे काही क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. नव्या संसदेच्या पहिल्या सत्रातील पहिल्या भाषणात मी खूप विश्वास आणि गर्वाने सांगतोय की आजचा हा दिवस खूप खास आहे. आजच्या या दिवशी मी महिला आरक्षण विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडलं आहे. तसेच पंतप्रधान म्हणाले या विधेयकाला आमच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
एका घटस्फोटीत महिलेचे वडील आणि भाऊ पाच महिन्याच्या अंतरातच दगावले. त्यानंतर महिला, तिचे दोन मुले व आई असे कुटुंब उघड्यावर आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीमध्ये गणेश चतुर्थीला सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना झाली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ मध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार करून काही उमेदवारांच्या उत्तर पत्रिकेतील गुण वाढवण्यात आल्याचा आरोप सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.
जुन्या संसदेतील अखेरच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या वास्तूला खूप मोठा इतिहास आहे. भारत स्वतंत्र झाला त्या घटनेचा साक्षीदार हा सेंट्रल हॉल आहे. या सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या तिरंगा, भारताचं राष्ट्रगीत यांचा स्वीकार झाला आहे. या इमारतीने अनेक ऐतिहासिक प्रसंग पाहिले आहेत. १९५२ नंतर जगातल्या जवळपास ४१ राष्ट्राध्यक्षांनी या सेंट्रल हॉलमध्ये येऊन माननीय खासदारांना संबोधित केलं आहे. आपल्या राष्ट्रपतींनी या हॉलमध्ये आत्तापर्यंत ८६ वेळा संबोधन केलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेने आत्तापर्यंत चार हजारांहून जास्त कायदे मान्य केले आहेत. दहशतवादाशी लढण्याविषयीचा कायदा, हुंड्याविरोधातला कायदा, मुस्लिमांना जो न्याय हवा होता, शाहबानो केसचं जे प्रकरण होतं त्यात ज्या चुका झाल्या होत्या त्या आपण सुधारल्या. ट्रिपल तलाक विरोधी कायदा आपण इथेच पास केला.
पुणे : गणेशोत्सवात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून (२० सप्टेंबर) मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन सायंकाळी पाचनंतर मध्यभागातील रस्ते वाहतुकीस बंद करुन वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
पुणे : काम करण्यास सांगितल्याने मुलाने वडिलांवर कात्रीने वार करुन त्यांचा खून केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. झोपेत असलेल्या वडिलांवर कात्रीने हल्ला करणाऱ्या मुलाला त्याच्या आईने रोखण्याचा प्रयत्न केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्याची आई जखमी झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ मधील सिरोंचा ते आरसअल्लीदरम्यान रस्ते बांधकामाची ३३ किलोमीटर अंतराची निविदा असताना २२ किलोमीटर रस्ता बांधकाम करून उर्वरित रस्ता न बांधता ६ कोटींची उचल करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.
जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी नसताना त्यांच्या नावावर दोन कोटी ३० लाख ६३ हजार रुपयांचे अनुदान लाटणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर आता जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिले असून तीन दिवसात चौकशी अहवाल मागितला आहे.
वेकोली बल्लारपूर क्षेत्रअंतर्गत असलेल्या धोपटाळा युजी टू ओसी कोळसा खाणीसाठी अधिग्रहण प्रकीयेतून सुटलेल्या कोलगांव व मानोली येथील शेतकऱ्यांच्या उर्वरीत ३७४ हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
श्री गणेशाच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून, विधिवत पूजा करून घरोघरी प्रतिष्ठापना आजपासून होणार आहे. त्यासाठी पूजा साहित्य, फुले खरेदीसाठी सोमवारी मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात गर्दी झाली होती. उपनगरातील बाजारपेठेतही सकाळपासून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.
सविस्तर वाचा
राज्यातील शाळा उद्योगपतींना विकल्या, अशी ओरड शालेय शिक्षण विभागाच्या एका निर्णयावर झाली.पण शासनास नेमके अभिप्रेत काय, याचा संभ्रम दूर करणारा आदेश शासनाने काढला आहे. या शाळा खाजगी कंपनीच्या दावणीला बांधण्याची टीका झाली.पण शाळांना केवळ वस्तू व सेवा देण्याचाच उल्लेख आदेशात आहे.संपूर्ण शाळाच कंपनीस देण्याचा स्पष्ट उल्लेख नाही.
ओबीसींचे गेल्या नऊ दिवसांपासून संविधान चौकात सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यावरून समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आले. माजी मंत्री सुनील केदार यांनी आंदोलन स्थगित होत असल्याचे जाहीर केले तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारकडून लेखी आश्वासन मिळेस्तोवर आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका मांडली.
कॅनडातील खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडानं भारताच्या उच्चाधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. भारताचा या हत्येशी संबंध असल्याचा थेट आरोपच जस्टिन ट्रुडेओ यांनी कॅनडाच्या संसदेत केला आहे.
नरेंद्र मोदी (PC : PTI)
महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मत्रिमंडळाची मंजुरी
केंद्र सरकारने बोलावलेलं संसदेचं विशेष अधिवेशन कालपासून (१८ सप्टेंबर) सुरू झालं आहे. महिला आरक्षण विधेयक या अधिवेशनाचा केंद्रबिंदू असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सोमवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर लोकसभा आणि राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाच्या बहुप्रतिक्षित विधेयकाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर आता महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे.