Parliament Special Session 2023: संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून बोलवण्यात आलं आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मंत्रिमंडळ आणि सर्वपक्षीय खासदार यांच्यासह संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर जे पहिलं विधेयक लोकसभेत मांडलं गेलं ते महिला आरक्षण विधेयक आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली असून आज आणि उद्या यावर साधकबाधक चर्चा होणार आहे. मोदींनी हे विधेयक मांडल्यापासूनच काँग्रेस आणि भाजपा यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. अशात आज काँग्रेसतर्फे सोनिया गांधींनी भूमिका मांडली आहे. या सगळ्या घडामोडींवर आणि देशात तसंच राज्यात काय काय घडणार हे आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून वाचणार आहोत.

Live Updates

Parliament Special Session| संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणावर चर्चा, सोनिया गांधी बोलणार?

19:54 (IST) 20 Sep 2023
“नष्ट होणारे जलस्त्रोत वाचविण्यासाठी अमृत सरोवर म्हणून…”; पर्यावरणवाद्यांचे पंतप्रधानांना साकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून राबविण्यात येणाऱ्या अमृत सरोवर प्रकल्पाचे स्वागत असून नॅशनल वेटलँड्स ॲटलासने दोन लाखांहून अधिक पाणथळ जागांसह ८० हजार अमृत सरोवरांना पाणथळ जागा म्हणून अधिसूचित करावे व त्यांचे संवर्धन करावे असे आवाहन पर्यावरणवाद्यांनी केले आहे.

सविस्तर वाचा

19:22 (IST) 20 Sep 2023
काँग्रेसने साठ वर्षात काय केलं? त्याचा हिशेब द्यावा- अमित शाह

महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने महिलांच्या अधिकारांची एक प्रदीर्घ लढाई संपणार आहे. जी २० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला नेतृत्वाखालील विकासाचं धोरण सगळ्या जगासमोर ठेवलं आहे. काही पक्षांसाठी महिलांचं सशक्तीकरण हा राजकीय मुद्दा असू शकतो. मात्र भाजपा किंवा नरेंद्र मोदींसाठी महिला सशक्तीकरण आणि महिलांसाठीचं हे विधेयक हा राजकीय अजेंडा नाही.

६० वर्षात काय दिलं याचा हिशेब कधी देणार?

अमित शाह यांनी विरोधी पक्षाने जी जी वक्तव्यं केली त्यावर उत्तर दिलं आहे. तुम्ही १० वर्षात काय केलं? हा हिशेब तुम्ही आमच्याकडे मागत आहात, मात्र स्वतः ६० वर्षांचा हिशेब कधी देणार? महिला आरक्षणासाठी देवेगौडा सरकारपासून मनमोहन सरकारपर्यंत चार प्रयत्न झाले. त्यावेळी हे विधेयक का मंजूर झालं नाही? असाही प्रश्न अमित शाह यांनी विचारला.

19:01 (IST) 20 Sep 2023
कंत्राटी पद्धतीने भरतीच्या विरोधात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण

सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सरकारी भरतीमध्ये गैरप्रकार होत आहेत. परीक्षा शुल्कच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडत आहे.

सविस्तर वाचा

18:34 (IST) 20 Sep 2023
५३ हजार वीज ग्राहक देयकात वाचवतात ६३ लाख, ‘ही’ आहे योजना…

महावितरणच्या विदर्भातील ५३ हजार ४७८ ग्राहकांनी वीजदेयकांसाठी छापील कागदाचा वापर बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या सर्व ग्राहकांचे वर्षाला ६४ लाख रुपये वीज देयकात वाचत आहे.

सविस्तर वाचा

17:50 (IST) 20 Sep 2023
सांगली : मोरयाच्या गजरात तासगावचा रथोत्सव उत्साहात पार पडला, उत्सवाचे यंदा २४४ वे वर्ष

सांगली : गुलालखोबर्‍याबरोबरच पेढ्यांची उधळण करीत आणि मोरयाच्या गजरात बुधवारी तासगावचा अडीच शतकांची परंपरा असलेला रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या रथोत्सवाला यंदा तासगावचे संस्थानिक पटवर्धन घराण्यातील वादाची किनार लाभली.

सविस्तर वाचा...

17:16 (IST) 20 Sep 2023
भाजप जिल्हा ग्रामीणची अवाढव्य कार्यकारिणी; सढळहस्ते पदांचे वाटप

आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने शहराप्रमाणे ग्रामीण भागातही सक्रिय पदाधिकाऱ्यांना सढळहस्ते पदांचे वाटप करुन संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. भाजपने जिल्हा ग्रामीणच्या (उत्तर) २०२३- २०२६ या वर्षासाठी जाहीर केलेल्या कार्यकारिणीतून तेच अधोरेखीत होत आहे.

सविस्तर वाचा

17:15 (IST) 20 Sep 2023
कल्याणमध्ये खेळाच्या मैदानावरील बेकायदा बांधकामावर कारवाई

कल्याण पश्चिम येथील उंबर्डे भागातील मुथा महाविद्यालयासमोरील खेळाच्या मैदानावर भूमाफियांनी बेकायदा बांधकामे केली होती. यासंदर्भाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या ब प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी ही बांधकामे जमीनदोस्त केली.

सविस्तर वाचा

17:08 (IST) 20 Sep 2023
चंद्रपूर : वीज कोसळून एक महिला ठार, अन्य एक महिला जखमी

चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी तालुक्यातील मौजा सिरकाडा या गावात प्रदीप यादव बोरकर यांच्या शेतात निंदनाचे काम सुरू असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास वीज कोसळून महानंदा मोतीराम अलोणे (६४ ) ही महिला ठार झाली तर अन्य एक महिला जखमी झाली.

सविस्तर वाचा...

16:56 (IST) 20 Sep 2023
बाप्पांची आरती ‘सुखकर्ता दुखहर्ता’चे रचियता कोण? असा आहे इतिहास व अर्थ

नागपूर : प्रत्येक कार्यात पहिल्या पूजेचा मान श्री गणेशाचा असतो. तो सगळ्यांचा प्रमुख आहे. बुद्धीचा देवता, विघ्नहर, संकटमोचक असलेल्या बाप्पाला भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला पुजले जाते.

सविस्तर वाचा...

16:40 (IST) 20 Sep 2023
शहापुरमध्ये छऱ्याची बंदुक झाडून विवाहितेची हत्या; सासरच्या मंडळींना शहापुर पोलिसांनी घेतले ताब्यात

वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन तसेच घरगुती कारणावरून सासरच्या मंडळींनी एका विवाहितेची छऱ्याची बंदुक झाडून हत्या केल्याची घटना तालुक्यातील अजनुप येथील बोंडारपाडा येथे घडली. रंजना भवर (२७) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी नवरा, सासू, सासरा यांसह सहा जणांना शहापुर पोलिसांनी ताब्यात आहे.

सविस्तर वाचा

16:37 (IST) 20 Sep 2023
तब्बल १५० सरकारी पदांसाठी भरती, सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी

नागपूर : केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाव्यतिरिक्तही अनेक महत्त्वाच्या, भरपूर पगार व प्रतिष्ठा असणाऱ्या नोकऱ्या आहेत. त्यासाठी जर प्रयत्न केले तर सुशिक्षित पदवीधरांना नव्या वाटा, नवीन संधीतून आयुष्याचे सोने करता येणे शक्य आहे.

सविस्तर वाचा...

16:23 (IST) 20 Sep 2023
ऋषिपंचमीनिमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; साडेचारशे दिंड्या दाखल

बुलढाणा : विदर्भ पंढरी शेगाव येथे आज बुधवारी गजानन पुण्यतिथी सोहळा (ऋषिपंचमी निमित्त) भाविकांची मांदियाळी जमली. विदर्भासह राज्यातील अन्य भागांतून शेकडो दिंड्या दाखल झाल्याने मंदिर परिसर व रस्ते आबालवृद्ध भाविकानी फुलल्याचे दिसून आले. श्री गजानन महाराज यांनी ११३ वर्षांपूर्वी तिथीनुसार ऋषिपंचमीला संजीवन समाधी घेतली होती.

सविस्तर वाचा...

16:22 (IST) 20 Sep 2023
कॉंग्रेसची घराणेशाही अन् राष्ट्रवादी काँग्रेस सरदारांची फौज, बावनकुळे यांची टीका

नागपूर : कॉंग्रेसने घराणेशाही केली आणि राष्ट्रवादी पक्ष ही सरदारांची फौज आहे. शरद पवार यांनी कुटुंबाशिवाय बाहेरच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही. भाजपाने देशाला मोठे नेतृत्व दिल्यामुळे आमच्या पक्षात सामान्य कार्यकर्ता मोठा होऊ शकतो. त्यामुळे रोहीत पवार नुकतेच राजकारणात आले आहे, त्यामुळे त्यांनी भाजपावर बोलण्यापूर्वी आपल्या पक्षाची परंपरा आणि संस्कृती बघावी, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सविस्तर वाचा...

16:21 (IST) 20 Sep 2023
बेकायदा बांधकामांना वीज पुरवठा देऊ नका; ठाणे महापालिका आयुक्तांचे टोरंट कंपनीला निर्देश

ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त बांगर यांनी नुकतीच एक बैठक घेऊन त्यात बेकायदा बांधकामांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

सविस्तर वाचा

15:08 (IST) 20 Sep 2023
VIDEO: ओडिशात गणपती आगमनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून बुलढाण्यातील सोहमचा मृत्यू

दूरवरच्या ओडिशा राज्यात शिक्षणासाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश स्थापना मिरवणुकीत उच्चदाबाचा विद्युत धक्का लागून वाहनातून खाली कोसळून तो दगावला. त्याचे काही सहकारी अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे.

सविस्तर वाचा

14:56 (IST) 20 Sep 2023
पनवेल पालिकेच्या ३७७ पदांच्या नोकर भरतीसाठी ५४ हजार ५५८ अर्ज, परिक्षेची तारीख लवकरच जाहीर होणार

पनवेल : पनवेल पालिकेच्यावतीने ३७७ पदांसाठी ५४ हजार ५५८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. सरळसेवेची ही परिक्षा कधी होणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. लवकरच परिक्षेची तारीख पनवेल पालिका आयुक्त जाहीर करतील असे पालिकेच्या जनसंपर्क विभागाने बुधवारी जाहीर केले.

सविस्तर वाचा...

14:40 (IST) 20 Sep 2023
आरक्षणाची अमलबजावणी होईल तेव्हा खरं-सुप्रिया सुळे

माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घेऊ नये या मताची मी आहे. मी कसं काय आरक्षण घेणार? कारण हे आरक्षण ज्या महिलांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी आहे. माझ्यासारख्या महिलांनी हेच काय कुठलंही आरक्षण मग ते मराठा असेल, ओबीसींचं असेल, धनगर, मुस्लिम असेल कुठलंही आरक्षण घेऊ नये. कारण ज्याला आरक्षण खरोखर गरजेचं आहे त्याला त्याचा फायदा होईल. आम्हाला शिक्षण मिळालं आहे आमच्या कुटुंबाने आम्हाला आमच्या पायावर उभं केलं आहे. त्यामुळे आम्ही आरक्षण घ्यायला नको. महिला आरक्षणाची अमलबजावणी झाली पाहिजे तेव्हा त्यावर बोलता येईल. ए

14:19 (IST) 20 Sep 2023
VIDEO: ओडिशात गणपती आगमनाच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागून बुलढाणेकर सोहमचा मृत्यू, पहा हा धक्कादायक व्हिडिओ

दूरवरच्या ओडिशा राज्यात शिक्षणासाठी गेलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेश स्थापना मिरवणुकीत उच्चदाबाचा विद्युत धक्का लागून वाहनातून खाली कोसळून तो दगावला. त्याचे काही सहकारी अत्यवस्थ असल्याचे वृत्त आहे.

सविस्तर वाचा

14:19 (IST) 20 Sep 2023
मुंबई : गणेशोत्सव काळात रात्री बेस्टची अतिरिक्त बससेवा

गणेशोत्सव सुरू झाला असून मुंबईमध्ये गणेश दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. तसेच देश-विदेशातील अनेक पर्यटक खास गणेशोत्सवात मुंबईला भेट देतात. गणेशोत्सवानिमित्त मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने नागरिकांसाठी अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

13:48 (IST) 20 Sep 2023
तलाठी भरती परीक्षा संपली, निकाल कधी जाहीर होणार? जाणून घ्या…

नागपूर : बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर १४ सप्टेंबरला संपली. १० लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली.

सविस्तर वाचा...

13:33 (IST) 20 Sep 2023
बाप्पाच्या अतिप्रिय मोदकाला महागाईची झळ, दरात प्रतिकिलो ५ ते १० टक्क्यांची वाढ

गोंदिया : मंगळवारी सर्वत्र जल्लोष आणि आनंदात गणरायाची स्थापना झाली. गणरायांचा आवडता मोदक हा पूर्वी घरातील महिला घरीच तयार करायच्या. मात्र यातही काळानुरूप बदल झाले आहेत. आता बहुतांश घरी बाजारातील मिष्ठान्नाच्या दुकानात मिळणाऱ्या मोदकलाच पहिली पसंती दिली जाते. यंदा बाप्पाच्या अतिप्रिय मोदकालाही महागाईची झळ बसली आहे.

सविस्तर वाचा...

13:19 (IST) 20 Sep 2023
अकोल्यात पोलिसांकडून दत्तक गणेश मंडळ योजना; काय आहे विशेष? जाणून घ्या…

अकोला : सणासुदीच्या काळात सुरक्षेसाठी अकोला पोलीस प्रशासन ‘दक्ष’ झाले. प्रत्येक गणेश मंडळासाठी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. प्रत्येक मंडळासाठी अंमलदार कर्तव्यावर ठेवण्यात आला आहे. सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

सविस्तर वाचा...

13:09 (IST) 20 Sep 2023
कल्याणमधील ठाकरे समर्थक शिवसैनिकाच्या विजय तरुण मंडळाला पोलिसांची नोटीस

कल्याण: येथील मुरबाड रस्ता रामबाग विभागातील ठाकरे गटाचे समर्थक ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी यांच्या विजय तरुण मंडळाला महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस दिली आहे.

सविस्तर वाचा...

13:05 (IST) 20 Sep 2023
बहुचर्चीत पीएम विश्वकर्मा योजनेचा फायदा काय, किती जातींना लाभ होणार? वाचा सविस्तर…

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपारिक कारागिरांचे कौशल्य टिकावे व त्यातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जाहीर केली आहे. योजनेच्या माध्यमातून देशातील ३० लाख कारागिरांना लाभ मिळणे अपेक्षित आहे.

सविस्तर वाचा...

12:55 (IST) 20 Sep 2023
आपल्या घरातली स्त्री संसदेत आली म्हणजे आरक्षण मिळालं असा अर्थ होत नाही-भावना गवळी

शिवसेना खासदार भावना गवळी यांनी हे बिल म्हणजे महिलांसाठी मोदी सरकारने घेतलेला अत्यंत महत्वाचा निर्णय आहे असं म्हटलं आहे. तसंच इंडिया आघाडी म्हणजे दलदल आहे ही दलदल आपल्याच वादांमध्ये अडकणार आहे आणि २०२४ ला कमळ पुन्हा फुलणार आहे असं वक्तव्य भावना गवळी यांनी केलं आहे. तसंच महिला आरक्षण बिल आणून सरकारने एक चांगली सुरुवात केली आहे. आम्ही त्यांच्या पाठिशी कायम आहोत असंही भावना गवळींनी म्हटलं आहे. स्त्रियांना इथपर्यंत पोहचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. मी देखील संघर्ष करुन इथपर्यंत आले आहे. मात्र काही कुटुंबातल्या लोकांना वाटतं आपल्या घरातली स्त्री या सभागृहात आली म्हणजे मिळालं आरक्षण. तर ते तसं नाही त्यासाठी ठोस पाऊल उचलणं आवश्यक होतं जे मोदींनी उचललं आहे. असं म्हणत भावना गवळींनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

12:50 (IST) 20 Sep 2023
हे बिल लवकरात लवकर पास करा, यावरुन राजकारण नको-कनिमोळी

संसदेत मी या बिलाविषयी आवाज उठवला होता. महिला आरक्षण विधेयक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे. मात्र भाजपा त्यावरुन राजकारण करु पाहतं आहे हे दुर्दैवी आहे. महिला आरक्षण हा आत्ता भाजपाचा निडवणुकीसाठी उभा केलेला जुमला आहे. माझी सरकारकडे मागणी आहे की हे बिल लवकरात लवकर पास करा असं डीएमके खासदार कनिमोळी यांनी म्हटलं आहे.

12:21 (IST) 20 Sep 2023
शिक्षण मंचाच्या अधिवेशनासाठी वसुली! अभ्यास मंडळ अध्यक्षाला पाच हजार तर सदस्याला तीन हजार रुपये मागितले

नागपूर : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ म्हणजेच विद्यापीठ शिक्षण मंचाच्या होऊ घातलेल्या चार दिवसीय अधिवेशनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणांच्या सदस्यांकडून पैसे मागितले जात असल्याची माहिती आहे.

सविस्तर वाचा...

12:16 (IST) 20 Sep 2023
नवी मुंबई : अल्प मानधन वाढीमुळे महापालिका शिक्षकांमध्ये असंतोष; आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या ठोक मानधनावरील अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांनी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पगारवाढीसाठी आमरण उपोषण सुरु केले होते.

सविस्तर वाचा...

11:52 (IST) 20 Sep 2023
इंस्टाग्रामवरील मित्राचे मैत्रिणीला अश्लील ‘मॅसेज’

नागपूर: प्रेमप्रकरण कुटुंबियापर्यंत पोहचल्यामुळे तरुणीने अचानक दुरावा केल्यावरून नाराज इंस्टाग्रामवरील मित्राने तरुणीला अश्लील मॅसेज केले. त्या युवकाची समजूत घातल्यानंतरही तो मॅसेज पाठवत होता. अखेर पोलिसात तक्रार करण्यात आली.

सविस्तर वाचा...

11:51 (IST) 20 Sep 2023
चंद्रपूर : तब्बल १ कोटी ११ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, ‘या’ तंबाखू तस्कराचे नाव चर्चेत

चंद्रपूर : राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची जिल्ह्यात तस्करी सुरू असून बल्लारपूर टोल नाक्यावर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता नागपूर व अमरावतीच्या दक्षता विभागच्या पथकाने १ कोटी ११ लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त केला. या कारवाईनंतर बल्लारपूरचा गुटखा किंग ‘जयसुख’चे नाव चर्चेत आले आहे.

सविस्तर वाचा...

संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून बोलवण्यात आलं आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मंत्रिमंडळ आणि सर्वपक्षीय खासदार यांच्यासह संसदेच्या नव्या इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर जे पहिलं विधेयक लोकसभेत मांडलं गेलं ते महिला आरक्षण विधेयक आहे.

PM Modi

पंतप्रधान मोदींनी लोकसभेत मांडलं महिला आरक्षण विधेयक. (PC : Sansad TV Youtube)

Story img Loader