आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात काय निर्णय घेतले जाणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. आज सकाळीच पत्रकारांशी संवाद साधत असताना अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जातील असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले आहेत. या अधिवेशनात नेमके कुठले निर्णय घेतले जातील हे अद्याप समोर आलेलं नाही. अशात विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत कमीवेळा येतात आणि जेव्हा येतात तेव्हा त्याचा इव्हेंट करतात.
काय म्हटलं आहे खरगे यांनी?
राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीबाबत हे वक्तव्य केलं आहे की, “भारताचे पंतप्रधान जेव्हा पंडित नेहरु होते, त्यावेळी ते म्हणायचे की जर तुमचे विरोधक हे प्रबळ नसतील तर तुमच्या सिस्टिममध्ये काहीतरी कमतरता राहिल्या आहेत. सध्याची अवस्था अशी नाही. विरोधी पक्ष मजबूत स्थितीत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना कमकुवत केलं जातं आहे. आरोप करायचे, त्रास द्यायचा, मग त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं, वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आणि मग पक्षात स्वागत करायचं. हेच चाललं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत खूप कमीवेळा येतात आणि जेव्हा येतात तेव्हा त्याचा इव्हेंट करतात.” असं म्हणत मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
मल्लिकार्जुन खरगेंनी मांडला मणिपूरचा मुद्दा
मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात मणिपूरचा मुद्दाही उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्या ठिकाणी जात आहेत, भेटी देत आहेत मात्र मणिपूरला जायला त्यांना वेळ नाही. आम्हाला संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात चर्चा हवी आहे. त्यावर उपसभापतींनी संमती दिली नाही. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खरगेंनी टीका केली. अटलबिहारी वाजपेयी हे जेव्हा देशाचे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात २१ वेळा त्यांनी परंपरेवर भाष्य केलं. तर मनमोहन सिंग यांनी ३० वेळा संसदेच्या परंपरेवर भाष्य केलं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त दोनदा भाष्य केलं ही खरंच लोकशाही आहे का? असाही प्रश्न खरगेंनी विचारला.