संसदेच्या विशेष पाच दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय बैठकीमध्ये अधिवेशनातील कामकाजासंदर्भात परिपत्रत जारी करण्यात आलं आहे. या परिपत्रकानुसार, संसदेच्या विशेष अधिवेशनात एकूण ८ विधेयके चर्चेसाठी येणार आहेत. विशेष म्हणजे, या विधेयकात केंद्रीय निवडणूक आयुक्तांचे अधिकार मर्यादित करण्यासंदर्भातील विधेयकाचा समावेश नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याशिवाय, नव्या संसद भवनातही याच अधिवेशनातून कामकाजाला सुरुवात होणार आहे.
कसं असेल कामकाज?
विशेष अधिवेशनाचं कामकाज नेमकं कसं असेल? यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांना माहिती दिली. “कामकाजाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये दोन्ही सभागृह भरतील. पहिल्या दिवशी संसदेचा उज्ज्वल इतिहास आणि संसद भवनाची भव्य परंपरा यावर दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून चर्चा होईल. दुसऱ्या दिवशी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये खासदारांचं फोटोसेशन होईल”, असं ते म्हणाले.
नव्या संसद भवनात कधी जाणार?
दरम्यान, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या देशाच्या नव्या संसद भवनामधून नेमकी नियमित कामकाजाला कधी सुरुवात होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. यासंदर्भात आता केंद्र सरकारने काढलेल्या संसद अधिवेशन कार्यक्रम पत्रिकेवरून माहिती समोर आली आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जुन्या संसद भवनात फोटोसेशन झाल्यानंतर सर्व खासदार नव्या संसद भवनात जातील आणि तिथे अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल.
विरोधकांची टीका
दरम्यान, विशेष अधिवेशनात नेमकं कामकाज कसं होणार आहे, याविषयी अद्याप स्पष्ट माहिती देण्यात न आल्याची टीका काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली. “यामागे नेमका काय हेतू आहे हे फक्त सरकारलाच माहिती आहे. कदाचित हे सरकार सगळ्यांनाच काहीतरी नव्या अजेंड्याने धक्का देईल”, असं ते म्हणाले. “अजूनपर्यंत संसद अधिवेशनाचा पूर्ण अजेंडा मिळालेला नाही. केंद्र सरकारने अधिवेशनासंदर्भातल्या संसद बुलेटिनमध्ये सूचक विधानं केली आहेत. त्याचा अर्थ ऐनवेळी केंद्र सरकार आणखी विधेयकं चर्चेला आणू शकतं. ते संसदेला यासाठी विश्वासात का घेत नाहीयेत?” असा सवाल तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केला आहे.