आंध्र प्रदेशाच्या विभाजामुळे निर्माण झालेल्या वादळात अखेरच्या अधिवेशनाचा दुसरा दिवसही वाया गेला. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज तेलंगणा राज्याच्या निर्मितीला विरोध करणाऱ्या सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे तहकूब करण्यात आले. सभागृह संचालनाची  जबाबदारी सरकारची असल्याचे सांगत भाजपने सर्व खापर काँग्रेसवर फोडले आहे.
तेलंगणाच्या मुद्यासोबत, श्रीलंकेतील तामिळींवर होणारे अत्याचार, अरुणाचल प्रदेशच्या युवकाची दिल्लीत झालेल्या हत्येचे पडसाद सभागृहात उमटले. तेलंगणाला विरोध करणारे बव्हंशी काँग्रेसचे सदस्या होते. वायएसआर काँग्रेसचे सदस्य जगनमोहन रेड्डी यांनीदेखील घोषणाबाजी केली. आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक पुढील आठवडय़ात सभागृहात सादर होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्यस्थिती पाहता त्यावर काँग्रेसमध्ये पुर्नविचार सुरु झाला आहे. काँग्रेसचे सब्बम हरी व तेलगू देसम पक्षाचे वेणूगोपाल रेड्डी यांनी अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी नोटीस दिली होती. लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत होत्या.  गोंधळ सुरुच राहिल्याने शेवटी मीरा कुमार यांनी प्रारंभी तासाभरासाठी व नंतर दिवसभरासाठी तहकूब केले.  राज्यसभेतही याचीच पुनरावृत्ती झाली.
    अगास्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर सौदा निश्चित करण्यासाठी ‘एपी’ व बडय़ा राजकीय कुटुंबाला पैसे देण्याची शिफारस मध्यस्थाने केल्याचे वृत्त उघडकीस आल्याने भाजप आक्रमक झाला आहे. पक्ष प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले की, देशाला ‘एपी’ व संबधित राजकीय कुटुंबाचे नाव जाणून घ्यायचे आहे. साऱ्यांना माहिती आहे ‘एपी’ म्हणजे कोण, असे वक्तव्य करीत जावडेकर यांनी सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले.