संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफझल गुरूला दिलेल्या फाशीचा निषेध करणारा तसेच अफझलचे शव त्याच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द करणाऱ्या मागणीचा पाकिस्तानी संसद नॅशनल असेंब्लीने पारित केलेला प्रस्ताव आज लोकसभेत सर्वसंमतीने फेटाळून लावला. पाकिस्तानने पुन्हा असे कृत्य करू नये, असा इशाराही लोकसभेने दिला आहे.
पाकिस्तानच्या असेंब्लीने केलेला हा प्रस्ताव म्हणजे आमचा देश व संसदेवर पुन्हा झालेला हल्ला आहे, अशी जळजळीत टीका भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनी केली. आता भारताने पाकिस्तानशी चर्चा बंद करावी, अशी मागणी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी केली. पाकिस्तानी संसदेच्या प्रस्तावाचे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संतप्त पडसाद उमटले व प्रश्नोत्तराचा तास गोंधळामुळे तहकूब करावा लागला. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला वारंवार ठोकरा खाव्या लागत असतील तर आमच्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या व्यवस्थापनात मोठी चूक आहे, अशी टीकाही जेटली यांनी केली.  पाकिस्तानी संसदेने अफझल गुरूप्रकरणी पारित केलेला प्रस्ताव अजिबात मान्य नसल्याचे नमूद करून यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत पाकिस्तानविरुद्ध प्रस्ताव पारित करण्याची मागणी केली. हा मुद्दा देशाची सार्वभौमता व अखंडतेशी संबंधित असल्याचे सांगून संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनाच सभागृहाच्या वतीने प्रस्ताव मांडण्याची विनंती केली. त्यानुसार मीरा कुमार यांनी चार परिच्छेदांचा प्रस्ताव मांडताना पाकिस्तानी संसदेचा १४ मार्च २०१३ चा प्रस्ताव फेटाळून लावला. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये लुडबुड तसेच अतिरेक्यांना समर्थन करण्यापासून पाकिस्न्तानने स्वत:ला दूर ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला. पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशासह संपूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्य हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही लोकसभेने दिला आहे.