काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपुष्टात आला. आझाद यांच्यासह चौघांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी आझाद यांनी देशभरातील मुस्लिम देशांचा दाखला देत प्रश्न उपस्थित केला. “मी त्या नशीबवान माणसांपैकी एक आहे, जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. मला भारतीय मुस्लिम असल्याचा अभिमान आहे. जगात जर कुठल्या मुस्लिमांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा, असं म्हणत आझाद यांनी धार्मिक वादावर भाष्य केलं.
गुलाम नबी आझाद यांनी निरोपाचं भाषण केलं. यावेळी बोलताना आझाद म्हणाले,”माझी नेहमीच अशी भूमिका राहली आहे की, आम्ही नशीबवान आहोत. स्वातंत्र्यानंतर माझा जन्म झाला. पण, आज गुगलवर वाचतो. यू ट्यूबवर बघतो. मी त्या नशीबवान लोकांपैकी आहे जे कधीही पाकिस्तानात गेले नाहीत. पण, जेव्हा मी वाचतो की पाकिस्तानात कशी परिस्थिती आहे. तेव्हा मला अभिमान वाटतो की, मी भारतीय मुसलमान आहे. इतकंच नाही तर मी असं म्हणेन की, जगात जर कोणत्या मुस्लिमांना अभिमान वाटायला हवा, तर तो भारतीय मुस्लिमांना वाटायला हवा. मागील ३०-३५ वर्षात अफगाणिस्तानपासून ते इराकपर्यंत आपण बघतोय की, कसे मुस्लिम एकमेकांसोबत लढत संपत चालले आहेत. तिथे तर हिंदू नाहीत. तिथे ख्रिश्चनही नाही. तिथे दुसरं कुणी लढत नाहीत. ते आपसातच लढत आहेत,” असं गुलाम नबी आझाद म्हणाले.
आणखी वाचा- आझाद यांना वाशिममधून पाडायचं ठरवलं, पण…; शरद पवारांनी सांगितला १९८२चा किस्सा
I am among those fortunate people who never went to Pakistan. When I read about circumstances in Pakistan, I feel proud to be a Hindustani Muslim: Congress MP Ghulam Nabi Azad in his retirement speech in RS pic.twitter.com/0nmJdkMWI8
— ANI (@ANI) February 9, 2021
आणखी वाचा- मी निरोप देणार नाही, परत येईपर्यंत तुमची वाट बघेन – संजय राऊत
पुढे बोलताना आझाद म्हणाले,”जेव्हा मी जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा पहिली बैठक सोपोरमध्ये घेतली होती. जेथून गिलानी दोन ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी झालेल्या बैठकीत मी म्हणालो होतो की, माझ्या सरकारमधील कोणताही मंत्री धर्म वा मशिद किंवा पक्षाच्या आधारावर न्यायनिवाडा करेल, तर मला लाज वाटेल की, मी या मंत्र्यासोबत काम करतोय,” असं आझाद म्हणाले. १५ फेब्रुवारी रोजी गुलाम नबी आझाद यांच्यासह इतर तीन खासदारांचा कार्यकाळ संपत आहे.