काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. चारही सदस्य जम्मू काश्मिरचं प्रतिनिधित्व करतात. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.
राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,”गुलाम नबी आझाद यांची क्षमता जम्मू काश्मीर आणि देशाच्या उपयोगी पडेल. मी अनेक वर्ष जम्मू काश्मीरमध्ये काम केलं. त्यावेळी स्कूटरवर फिरण्याची संधी मिळाली होती. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जे कुणी हे पद सांभाळेल त्यांना गुलाम नबी यांच्यासारखं राहताना अडचण येईल. कारण गुलाम नबी आझाद हे पक्षाबरोबरच देशाची आणि संसदेचीही काळजी करायचे. त्यांनी देशाला प्राधान्य दिलं. मी शरद पवार यांनाही याच श्रेणीत बघतो. मी एक बैठक घेत होतो. त्यावेळी त्यांनी फोन करून सांगितलं की, सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घ्या. मी ती बैठक घेतली. २८ वर्षांचा कार्यकाळ हा खूप मोठा असतो,” असं मोदी म्हणाले.
“मी तेव्हा संसदेत नव्हतो. मी आणि गुलाम नबी आझाद यांच्याशी चर्चा करत होतो. त्यावेळी पत्रकारांनी विचारलं. त्यावेळी गुलाम नबी म्हणाले होते, आम्हाला नेहमी वादविवाद करताना बघता पण, आम्ही कुटुंबासारखे आहोत. गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरची आठवण यावी असं गार्डन तयार केलेलं आहे,” असंही मोदी यांनी यावेळी सांगितलं.
आणखी वाचा- मी निरोप देणार नाही, परत येईपर्यंत तुमची वाट बघेन – संजय राऊत
#WATCH: PM Modi gets emotional while reminiscing an incident involving Congress leader Ghulam Nabi Azad, during farewell to retiring members in Rajya Sabha. pic.twitter.com/vXqzqAVXFT
— ANI (@ANI) February 9, 2021
आणखी वाचा- आझाद यांना वाशिममधून पाडायचं ठरवलं, पण…; शरद पवारांनी सांगितला १९८२चा किस्सा
“जेव्हा गुजरातमधील यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी मला गुलाम नबी यांचा सर्वात आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांना मृतदेह आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो असं सांगितलं. त्यानंतर रात्रीही ते विमानतळावर होते. गुलाम नबी यांनी विमानतळावरून पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच चिंता ते करत होते. पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे मी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे,” असं सांगत असताना पंतप्रधान मोदींचे डोळे भरून आले.