पठाणकोट येथील हवाईतळावर आणखी एक दहशतवादी हल्ला होणार असल्याची धोक्याची सूचना गृह खात्याशी संबंधित असणाऱ्या संसदीय स्थायी समितीकडून देण्यात आली आहे. या समितीने मंगळवारी यासंदर्भातील इशारा दिला. पठाणकोट येथून परतल्यानंतर आम्ही सरकारला याठिकाणी आणखी एक हल्ला होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार या परिसरात अजूनही काही दहशतवादी दडून बसले आहेत. त्यामुळे हवाईतळावर हल्ला होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती संसदीय समितीचे अध्यक्ष पी. भट्टाचार्य यांनी दिली.
दहशतवादी याठिकाणी कुठे आणि कशाप्रकारे लपून बसले आहेत, हे शोधणे आमचे काम नाही. मात्र, आम्हाला गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी नक्कीच जवळपास दडून बसले आहेत, असे भट्टाचार्य यांनी सांगितले. आम्ही यासंबंधी सरकारला सांगितल्यानंतर याठिकाणी लष्कराच्या तुकड्या पाठविण्यात आल्या. लष्कराच्या दाव्यानुसार, आता पठाणकोट हवाईतळाची सुरक्षा पूर्णपणे कडेकोट करण्यात आली आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त समितीला संसदेच्या स्थायी समितीकडून विरोध दर्शविण्यात आला होता.