कर्नाटकातील हॉस्पेट आणि गोव्यातील वास्कोदरम्यान गोव्याच्या हद्दीतील रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्याचा दक्षिण-पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी फेटाळून लावला आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने राज्यातील रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाची मागितलेली परवानगी आपण फेटाळून लावली आहे, असे पर्रिकर यांनी पत्रकारांना सांगितले.
काही उद्योजकांना मार्मागोवा पोर्ट ट्रस्टपासून कोळशाची वाहतूक करण्यासाठीच रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण हवे आहे आणि म्हणून आम्ही त्यास अनुमती देणार नसल्याचे पर्रिकर यांनी नमूद केले. अशा प्रकारच्या नव्या प्रकल्पांमुळे राज्यातील औद्योगिकीकरण वाढीस लागेल असेही वाटत नाही, असे पर्रिकर म्हणाले. गोव्याच्या हद्दीपर्यंतच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण होऊ शकते, गोव्याच्या हद्दीत नव्हे, असे त्यांनी निक्षून बजावले. राज्यातील एकाच रेल्वेमार्गावर आम्ही खूश असून त्याच्या दुहेरीकरणाची गरज नसल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केले. ‘गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इण्डस्ट्री’ने याआधी रेल्वेमार्गाचा पुरस्कार केला होता. सध्या दिवसभरात या रेल्वेमार्गावरून प्रवासी आणि मालवाहतुकीच्या केवळ १२ गाडय़ा धावतात आणि दुहेरीकरण झाल्याखेरीज क्षमता वाढविता येणार नसल्याचा दावा चेंबरने केला होता.

Story img Loader