केंद्रीय गुप्तचर विभागाने भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत ‘क्लीन चिट’ दिल्याशिवाय आपण येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये पाऊल ठेवणार नाही, असे निक्षून सांगणारे राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी आपण दिलेला शब्द पाळताना सुमारे सात वर्षांनी याच चित्रपटगृहास भेट देऊन तेथे सिनेमाही पाहिला.
मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या मागील कारकीर्दीत पर्रिकर यांनी या इमारतीच्या बांधकामास मंजुरी दिली होती. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (‘इफ्फी’)चा पाया याद्वारे देशात रचला जावा यासाठी भाडेतत्त्वावर ही इमारत आयनॉक्सला मल्टिप्लेक्स चालविण्यासाठी देण्यात आली होती.
मात्र विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होऊन सत्ता सोडणे भाग पडल्यानंतर या इमारतीच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा व निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ लागला. त्या वेळी या प्रकरणात आपल्याला ‘क्लीन चिट’ मिळाल्याशिवाय या इमारतीत आपण पाऊल ठेवणार नाही, असे मनाशी ठरविले होते. मात्र तशी प्रतिज्ञा केली नव्हती, असे पर्रिकर यासंबंधात शनिवारी पीटीआयशी बोलताना म्हणाले.
गेल्याच वर्षी केंद्रीय गुप्तचर विभागाने त्यांची यासंबंधातील आरोपातून मुक्तता केली. सध्या या मल्टिप्लेक्समध्ये ‘इफ्फी’ चित्रपट महोत्सव सुरू असून काल पर्रिकर यांनी या ठिकाणी भेट देताना या महोत्सवात कोकणी भाषेतील एकमेव चित्रपट ‘दिगंत’ही पाहिला.     

त्या वेळी या प्रकरणात आपल्याला ‘क्लीन चिट’ मिळाल्याशिवाय या इमारतीत आपण पाऊल ठेवणार नाही, असे मनाशी ठरविले होते. मात्र तशी प्रतिज्ञा केली नव्हती-  मनोहर पर्रिकर

Story img Loader