आपल्या मंत्र्यांविरोधात बोगस तक्रारी दाखल करणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांना अनाठायी प्रसिद्धी देत असल्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे. बोगस लोकांनी मंत्र्यांविरोधात बोगस तक्रारी दाखल केल्या आहेत, परंतु जे अशा तक्रारी करीत आहेत, त्यांनाच वृत्तपत्रांमध्ये अनाठायी प्रसिद्धी मिळते, ही सर्वात दुर्दैवी बाब आहे, असे पर्रिकर म्हणाले. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि दयानंद मांद्रेकर या दोन भाजपच्या मंत्र्यांचे अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांशी लागेबांधे असल्याची तक्रार काँग्रेसचे प्रवक्ते सुदीप तामणकर यांनी केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय)केली आहे. तामणकर यांच्या या तक्रारींना वृत्तपत्रांमध्ये मुख्य मथळा मिळाला.  या सर्व प्रकरणाचा समाचार घेताना पर्रिकर यांनी एकूणच प्रसारमाध्यमांवर टीकेची तोफ डागत प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आणि कार्यपद्धती यावरूनच प्रतिबिंबित होते, असे मत व्यक्त केले. तामणकर यांची तक्रार गुन्हा अन्वेषण विभागाने २००९मध्येच नोंदवून घेतली होती आणि ती बोगस असल्याचे तेव्हाच तपासाअंती सिद्धही झाले होते, याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. तामणकर आता ज्या तक्रारींचा उल्लेख करीत आहेत, त्याच तक्रारी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री रवी नाईक यांनीही मांडल्या होत्या. त्यांचे संबंधित दस्तावेजही त्यांनी विधानसभेत सादर केले, परंतु या तक्रारी बोगस असल्याचे त्यांच्या ध्यानी आले. या तक्रारीत काही तथ्य असते तर नाईक हे गप्प बसले असते काय, अशी विचारणा पर्रिकर यांनी केली.

Story img Loader