परिया गावातील आसाराम बापूंच्या आश्रमाचा काही भाग सोमवारी आंदोलकांनी जाळून टाकला. लैंगिक शोषणाच्या आरोपावरून गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून आसाराम बापू अटकेत आहेत. सुरुवातील त्यांना जोधपूरमधील पोलीसांनी अटक केली. त्यानंतर सुरतमध्ये त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना गुजरात पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर आसाराम बापूंच्या पूर्वीच्या समर्थकांनी त्यांच्यावर चिडून आश्रमाचा काही भाग जाळल्याचे पोलीसांनी सांगितले.
वलसाडमधील पार्डी तालुक्यातील परिया गावामध्ये हा आश्रम आहे. ज्या लोकांनी या आश्रमासाठी जागा दिली होती. त्यांच्यापैकी काहींनी सोमवारी संध्याकाळी आश्रमाच्या आवारात प्रवेश करून त्याचा काही भाग जाळून टाकला. आंदोलन करणारे सर्वजण आसाराम बापूंचे समर्थक होते. मात्र, त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर चिडलेल्या गावकऱयांनी आसाराम बापूंना विरोध दर्शविण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले.

Story img Loader