Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं, तर ‘आप’ला फक्त २२ जागा मिळवण्यास यश आलं. आता दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. भाजपाला एकूण ४८ जागा आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत, काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. या निवडणुकीत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षासाठी हा देखील एक मोठा धक्का मानला जात आहे. असं असतानाच आता आम आदमी पक्षात उभी फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आम आदमी पक्षात उलथापालथ होणार असल्याचा दावा काँग्रेसचे नेते तथा पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी केला आहे. एवढंच नाही तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे आधीच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत, ते दिल्लीच्या आम आदमी पक्षापासून वेगळा मार्ग स्वीकारू शकतात, असा मोठा दावा प्रताप सिंग बाजवा यांनी केला. तसेच मुख्यमंत्री भगवंत मान हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकू शकतात, असंही प्रताप सिंग बाजवा यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आम आदमी पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रताप सिंग बाजवा काय म्हणाले?

“दिल्लीतील पराभवानंतर पंजाबमधील भगवंत मान सरकार टिकणं कठीण आहे. कारण पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आधीच दोन गटांमध्ये विभागला आहे. पंजाबमधील’आप’ दिल्लीच्या नेतृत्वाशी ताळमेळ ठेवण्यास सक्षम नाही. आता दिल्लीतील परभावामुळे ‘आप’चे दिल्लीतील नेतृत्व पंजाबवर जास्त लक्ष केंद्रीत करेल. पण हे मुख्यमंत्री मान सहन करणार नाहीत. त्यामुळे ‘आप’मध्ये नेतृत्वासाठी संघर्ष होईल आणि यामुळे फूट पडेल”, असा दावा प्रताप सिंग बाजवा यांनी केला. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

प्रताप सिंग बाजवा यांनी असंही म्हटलं आहे की, “आम आदमी पक्षाचे ३० पेक्षा जास्त आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. तसेच ते आमदार पक्ष बदलण्यास तयार आहेत. कारण पंजाबच्या नेतृत्वाचे आधीच दिल्लीच्या नेतृत्वाशी मतभेद आहेत. त्यामुळे पंजाब ‘आप’ आणि दिल्ली ‘आप’ यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरु आहे. तसेच भगवंत मान हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संपर्कात आहेत, ते’आप’च्या फुटीत एकनाथ शिंदे यांच्यासारखी भूमिका घेऊ शकतात”, असं प्रताप सिंग बाजवा यांनी म्हटलं.

दरम्यान, दिल्लीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव हा फक्त भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि निव्वळ अहंकारामुळे झाला आहे. तसेच दिल्लीच्या विधानसभेच्या जागा गमावल्या त्यालाही हेच कारण असल्याचं प्रताप सिंग बाजवा यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी गुजरात आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार उभे करून इंडिया आघाडीत चिंता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही बाजवा यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Partap singh bajwa on aap politics bhagwant mann vs arvind kejriwal delhi election result 2025 gkt