PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024: लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर भाजपाप्रणित एनडीएने सत्तास्थापन केली आहे. एनडीएचे प्रमुख नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपध घेतली. तसेच मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळातील ६३ मंत्र्यांनी आज (१० जून) मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचाही समावेश आहे. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. त्यामुळे भाजपाला सत्तास्थापनेसाठी इतर पक्षांवर अवलंबून राहावं लागलं नव्हतं. तेव्हा भाजपाने इतर पक्षांना मोठी मंत्रिपदं दिली नव्हती. तसेच मंत्रिमंडळात इतर पक्षांमधील केवळ तीन ते चारच चेहरे होते. मात्र यावेळी भाजपाला केवळ २४५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी भाजपा चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देशम पार्टी, नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल आणि एनडीएतील इतर पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे यावेळी सत्तेत वाटेकरी वाढले आहेत. भाजपाने अनेक मित्रपक्षांच्या नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. मात्र महाराष्ट्रातील मित्रपक्षांवर अन्याय केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
भाजपाने दोन खासदार असलेल्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर या पक्षाला दोन कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत. तर केवळ एक खासदार असलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षाला एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं आहे. स्वतः जीतन राम मांझी यांनी आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच अपना दल या पक्षाच्या प्रमुख आणि एकमेव खासदार अनुप्रिया पटेल यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. मात्र सात खासदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एकच राज्यमंत्रिपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला एक खासदार निवडून आलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एकही मंत्रिपद दिलेलं नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, अजित पवार गटाचा पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात विचार केला जाईल.
भाजपा नेहमीच महाराष्ट्रावर अन्याय करत आली आहे, असा आरोप सातत्याने विरोधक करत आले आहेत. हेच चित्र भाजपाच्या मंत्रिमंडळातही पाहायला मिळालं. भाजपाने मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश केला आहे. यामध्ये नितीन गडकरी, पीयुष गोयल या दोघांना कॅबिनेट मंत्रिपद तर मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदास आठवले यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. भाजपाने तब्बल ४८ खासदार असणाऱ्या बलाढ्य महाराष्ट्रातील केवळ दोनच नेत्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिल्याने त्यांच्यावर टीका होऊ शकते.
अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांचं मंत्रिपदासाठी नाव चर्चेत होतं. तसेच त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले एकमेव खासदार सुनील तटकरे देखील मंत्रिपदासाठी इच्छूक होते. मात्र त्यांच्या पक्षाला मंत्रिपद मिळणार नाही हे सकाळीच स्पष्ट झालं. एनडीएतील प्रमुख नेत्यांनी मंत्रिपदासाठी अजित पवार गटाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही.