यंदाच्या निवडणूकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी आपल्या नवीन घरी वास्तव्याला जाण्याची इच्छा व्यक्त केलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आपल्या नवीन घरी विनामूल्य पाणी आणि वीज दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
यासाठी नगर विकास मंत्रालयाने आपल्या आधीच्या नियमांमध्ये बदल केला असल्याचे समजते. त्यामुळे नवीन घरी विनामूल्य पाणी आणि वीज देऊ करून यूपीए सरकारने पंतप्रधानांना निवृत्तीचे गिफ्ट देऊ केले असल्याचेच म्हणावे लागले. परंतु, या निर्णयामुळे फक्त पंतप्रधानच नाही, तर आता नवी दिल्लीत सरकारी बंगल्यांमध्ये वास्तव्याला असलेल्या माजी पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उप-राष्ट्रपती यांच्याबाबतीतही हा नियम लागू होण्याची शक्यता आहे.
येत्या १६ मे पूर्वी पंतप्रधानांनी आपल्या नव्या निवासस्थानी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पंतप्रधानांच्या नव्या शासकीय निवासस्थानी रंगरंगोटी सुरू आहे. याच बंगल्यात याआधी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित वास्तव्याला होत्या. आपले निवासस्थान अतिशय साधे असावे अशी इच्छा देखील पंतप्रधानांनी व्यक्त केली. तसेच घरातील फर्निचर, एसी इत्यादींचा खर्च २.५ लाखांपेक्षा जास्त नसावा असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले की, ‘याआधी या बंगल्यात शीला दीक्षित वास्तव्याला असताना एकूण २६ एसी बसविण्यात आल्या होत्या. त्या केरळच्या राज्यपाल झाल्यानंतर सर्व एसी काढून नेण्यात आल्या. आता या बंगल्यात वास्तव्याला येणाऱया मनमोहन सिंग यांनी फक्त चार किंवा पाच ‘एसी’च असाव्यात.’ असे म्हटले आहे.
शासकीय नियमांनुसार पंतप्रधानांना आपल्या जवळ केवळ १४ वैयक्तीक कर्मचारी ठेवता येणार असून दरमहा ६,००० रु. किरकोळ खर्चासाठी प्राप्त होणार आहेत. तसेच त्यांना राहत्या घराचे दरमहा १,२०० रुपये किमान भाडे द्यावे लागणार आहे. विद्यमान खासदारांना पाणी आणि वीजबीलात सवलत देण्याचा सुविधा आहे परंतु, माजी पंतप्रधानांच्या बाबतीत असा कोणताही नियम अस्तित्वात नाही. त्यामुळे पंतप्रधानांना निवृत्तीनंतर विनामूल्य पाणी आणि वीज मिळणार आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा