देशात सोमवारी ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच १४ ऑगस्टला भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान भारतीयांनी भोगलेल्या दु:खाची आणि बलिदानाची आठवण करून देण्यासाठी “फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस”पाळण्यात आला. या दिवसाचं महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी इतिहासाच्या शालेय पाठ्यपुस्तकात याचा समावेश करावा, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी केली आहे. यादव यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिले आहे.
“जगातील सर्वात मोठ्या फाळणीच्या क्रुर घटनेबाबत आत्ताच्या आणि पुढच्या पिढींना खरी माहिती मिळाली पाहिजे. १९४७ मध्ये झालेल्या या भयानक घटनेचा पाठ्यपुस्तकात समावेश केल्यानंतरच हे शक्य होईल”, असे सिंह यांनी या पत्रात म्हटले आहे. फाळणीचं दु:ख कधीही विसरले जाऊ शकत नाही, असे मोदी यांनी म्हटल्याचा उल्लेखही सिंह यांनी या पत्रात केला. दरवर्षी फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस पाळल्याने समाजातील भेदभावाचे विष नष्ट होईल आणि राष्ट्रीय एकात्मता आणखी मजबूत होईल, असा आशावाद सिंह यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनतेला फाळणीचे नेमके कारण आणि पार्श्वभूमी माहिती असावी, असेही सिंह म्हणाले.
“स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्यांची संख्या देशात मोठी आहे. देशाचं विभाजन का झालं? यामागची पार्श्वभूमी काय? लाखो लोकांनी फाळणीमुळे कसा त्रास सहन केला? या दुर्देवी घटनेसाठी नेमकं कोण जबाबदार? याबाबत वास्तविक आणि खरी माहिती उपलब्ध नाही”, अशी नाराजी सिंह यांनी व्यक्त केली.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर यावर्षी १४ ऑगस्टला दुसऱ्यांदा देशभरात “फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस”पाळण्यात आला. या दिवशी भाजपाने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अखंड भारताच्या फाळणीला जबाबदार घटनांचा आढावा या व्हिडीओतून घेण्यात आला होता. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मोहम्मद अली जिनांच्या मुस्लीम लीग पुढे झुकून भारताची फाळणी केली, असा आरोप या व्हिडीओमधून करण्यात आला होता. या आरोपांना काँग्रेस नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.