पीटीआय, वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका या जगातील दोन सर्वात मोठय़ा लोकशाही देशांदरम्यानची भागीदारी अधिक दृढ होईल, तसेच समृद्ध आणि सुरक्षित हिंदू-प्रशांत प्रदेशाप्रति दोन्ही देशांची कटिबद्धता बळकट होईल, असा विश्वास व्हाइट हाऊसतर्फे व्यक्त करण्यात आला. दोन्ही देशांदरम्यान महत्त्वाचे संरक्षण करार जाहीर केले जातील. भारत अमेरिकेकडून सशस्त्र ड्रोनची खरेदी करण्यासंबंधी दोन्ही राष्ट्रप्रमुखांकडून घोषणा केली जाईल, असे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांच्या औपचारिक स्वागतापूर्वी अमेरिकी अध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसतर्फे या अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘मुक्त, खुल्या, समृद्ध आणि सुरक्षित हिंदू-प्रशांत प्रदेशाप्रति दोन्ही देशांची सामायिक कटिबद्धता अधिक बळकट होईल तसेच संरक्षण, प्रदूषणरहित ऊर्जा आणि अवकाश या क्षेत्रांसह व्यूहरचनात्मक तंत्रज्ञान भागीदारी वाढवण्याविषयी आमचा सामायिक निर्धार मजबूत होईल.’

अमेरिका बंगळूरु आणि अहमदाबाद येथे वाणिज्य दुतावास उघडणार आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. भारतही सिएटलमध्ये वाणिज्य दूतावास उघडणार आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने सव्वा लाख भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा दिला. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून गेल्या वर्षी हे प्रमाण २० टक्के इतके होते. भारताच्या अमेरिकेत सध्या वॉशिंग्टनमधील दूतावासाव्यतिरिक्त न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्को, शिकागो, ह्युस्टन आणि अटलांटा येथे वाणिज्य दूतावास आहेत. तर अमेरिकेचे मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद येथे वाणिज्य दूतावास आहेत.

पंतप्रधानांकडून बायडेन यांना मौल्यवान भेटवस्तू, शुभेच्छांमध्ये भारतीय परंपरेची झलक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना खास कलाकारांनी नक्षीकाम केलेली चंदनाची एक सुंदर पेटी भेट दिली. ती भारतीय परंपरेचे मूल्य आणि सन्मान अधोरेखित करते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मैसूरमधील चंदनापासून तयार करण्यात आलेल्या या पेटीवर जयपूरमधील अनुभवी कलाकारांनी आकर्षक नक्षीकाम केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या पेटीव्यतिरिक्त उपनिषदातील १० सिद्धांतांवर आधारित एक इंग्रजीत भाषांतर केलेल्या पुस्तकाची प्रतही बायडेन यांना दिली. बायडेन यांना देण्यात आलेल्या अन्य भेटवस्तूंमध्ये राजस्थानमधील कलाकारांनी नक्षीकाम केलेला चांदीचा नारळ, २४ कॅरेट सोन्याचे नाणे आणि हॉलमार्क असलेल्या चांदीच्या नाण्याचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बायडेन यांना भेट दिलेल्या चंदनाच्या पेटीत कोलकाता येथील कलाकारांनी तयार केलेली भगवान गणेश प्रतिमा आणि दीपक आहे.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि ‘फस्र्ट लेडी’ जिल यांनी पंतप्रधान मोदींना अधिकृत भेट म्हणून २० व्या शतकाच्या पूर्वार्धातील हस्तनिर्मित, प्राचीन अमेरिकन पुस्तक ‘गॅली’ भेट म्हणून दिले. अन्य काही महत्त्वाच्या वस्तूही भेट म्हणून दिल्या.