भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पाटण्यात रविवारी हुंकार मेळाव्याच्या वेळी घडवण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सहानुभूती व्यक्त केली. काही काळ ते या कुटुंबीयांसमवेत होते.
मोदी यांनी या मृतांच्या कुटुंबीयांना असे आश्वासन दिले की, पक्षाच्या वतीने त्यांना मदत केली जाईल. बिहारमधील ज्या चार जिल्ह्य़ातील हे मृत होते त्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. नालंदा या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जिल्ह्य़ातही ते गेले होते.
मोदी यांच्या आजच्या बिहार भेटीत कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती कारण भाजपने पाटणा मेळाव्याच्या वेळी सुरक्षेत त्रुटी असल्याच्या कारणास्तव नितीशकुमार यांच्या सरकारवर टीका केली होती. मोदी यांच्या हुंकार मेळाव्याच्या आधी पाटणा येथील गांधी मैदानावर बॉम्बस्फोट मालिका झाली होती. स्फोटात मरण पावलेले लोक हे शहीद आहेत असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले आहे. मोदी यांच्या भेटीला आज सकाळी धुक्यामुळे दोन तास उशीर झाला. त्यांनी भाजपच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा धनादेश दिला. नितीशकुमार यांनी दिलेल्या रकमेइतकीच रक्कम मोदी यांनी या मृतांच्या नातेवाईकांना दिली आहे. मोदी पहिल्यांदा पाटण्यातील गौरीचक वसाहतीत गेले व तिथे ६५ वर्षीय राजनारायण सिंग यांची भेट घेऊन सांत्वन केले. तिथे जमिनीवर बसून धनादेशही त्यांच्या स्वाधीन करून सहवेदना प्रकट केल्या.
यावेळी बिहारच्या लोकांचे कौतुक करताना ते म्हणाले की, ब्रिटिश राजवटीत स्वातंत्र्यसैनिकांनी जो विरोध केला, सहनशीलता दाखवली तीच बॉम्बस्फोट मालिकेत बिहारच्या लोकांनी दाखवली. स्फोट होऊनही लोक खंबीर राहिले. त्यांनी मेळाव्यात हजेरी लावली, बिहारच्या या लोकांची तुलना ब्रिटिश राजवटीशी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांशी करावी लागेल.  ब्रिटिश लोक भारतीयांना घोडय़ांच्या टापाखाली कसे चिरडत ते आपण चित्रपटात बघतो, पोलिसांनी कसे अत्याचार केले ते बघतो पण तेव्हा लोक डगमगत नसत, तेच या मेळाव्याच्या वेळी घडले, लोक बसून राहिले त्यांनी यूपीए सरकार व नितीशकुमार यांचे सरकार हटवण्यासाठी निर्धार दाखवला, असे मोदी यांनी जयप्रकाश विश्रामगृहात सांगितले.
खराब हवामानामुळे ते गोपाळगंज व सुपुआल येथे जाऊ शकले नाहीत. कैमुर येथे निशीजा, बेगुसराय येथे बारीयापूर व नालंदातील अहियापूर येथे त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.

Story img Loader