Germany Pakistan Consulate Attack : जर्मनीतल्या फ्रँकफ्रंट मध्ये असलेल्या पाकिस्तान (Pakistan) दुतावासावर अफगाणी नागरिकांनी जोरदार हल्ला चढवला, यावेळी पाकिस्तानचा झेंडाही खाली खेचण्यात आला. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात जो हिंसाचार केला जातो आहे त्यामुळे संतापलेल्या अफगाणी पश्तून नागरिकांनी फ्रँकफ्रंटच्या पाकिस्तानी दुतावासावर हल्ला केला.
गिलामन वजीर यांची ७ जुलैला हत्या
पश्तून तहफ्फुज मुव्हमेंट अर्थात पीटीएमचे वरिष्ठ सदस्य आणि प्रसिद्ध कवी गिलामन वजीर यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. वजीर यांच्यावर ७ जुलै रोजी हल्ला करण्यात आला. त्यामुळे पश्तून नागरिकांची नाराजी आहे. यातूनच पाकिस्तानच्या (Pakistan) दुतावासावर हल्ला करण्यात आला.
नेमकं काय घडलं?
अफगाणी नागरिकांनी आंदोलन करताना पाकिस्तानी दुतावासाच्या इमारतीच्या आवारात प्रवेश केला. तसंच पाकिस्तनाचा राष्ट्रीय झेंडा या सगळ्यांनी हटवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सगळ्या राड्यानंतर पाकिस्तान सरकारने या घटनेचा निषेध नोंदवला आहे. जर्मनीतल्या सुरक्षा अधिकाऱ्यांचं हे अपयश आहे असंही पाकिस्तानने म्हटलं आहे.
पाकिस्तानकडून जर्मनीचा जोरदार निषेध
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी जी घटना घडली त्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसंच आमच्या तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव आता धोक्यात आहे असं पाकिस्तानने जर्मनीला सुनावलं आहे. पाकिस्तानच्या विरोधकांनी आमच्या दुतावासावर हल्ला केला. यावेळी त्यांना रोखण्यात जर्मनीचे अधिकारी कमी पडले. १९६३ च्या नियमानुसार दुतावासाची सुरक्षा करणं ही त्या-त्या देशाची जबाबदारी असते. जर्मन सरकारने या घटनेत हयगय केली. आता १९६३ च्या नियमानुसार आणि करारानुसार आमचं त्यांना हे आवाहन आहे की जर्मनीने आता पाकिस्तान दुतावासात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. त्याबद्दल आम्हाला खात्री द्यावी की त्यांच्या जिवाला काही होणार नाही. जर्मनी सरकारने लवकरात लवकर हिंसा करणाऱ्यांना अटक करण्यासाठी योग्य पावलं उचलावीत. सुरक्षेत ज्यांनी चूक केली त्यांच्याकडून त्याचं उत्तर घ्यावं असंही पाकिस्तानने म्हटलं आहे.
दगडफेक करण्यात आली, पाकिस्तानचा झेंडाही खेचला
समोर आलेल्या व्हिडीओनुसार आणि माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जे आंदोलक होते त्यांनी पाकिस्तानी दुतावासात प्रवेश केला. तसंच त्यांनी या ठिकाणी दगडफेक केली. पाकिस्तानचा (Pakistan) झेंडा खाली खेचला आणि तो जाळण्याचाही प्रयत्न केला. साधारण १० हून अधिक जणांच्या जमावाने हा हल्ला केला. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. पाकिस्तानच्या दुतावासावर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.