बिहार लोकसभेसाठी ‘एनडीए’चे जागावाटप सोमवारी (१८ मार्च) जाहीर झाले. भाजपा नेते आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांनी बिहारमधील ४० जागांसाठी वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यामध्ये भाजपा १७, संयुक्त जनता दल १६, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला ५, तर जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चाला एक व उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला एक जागा देण्यात आली आहे. मात्र, मंत्री पशुपती पारस यांच्या लोक जनशक्ती पार्टीला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे पशुपती पारस हे नाराज झाल्याचे बोलले जात होते. यानंतर अखेर पशुपती पारस यांनी आज (१९ मार्च) केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
पशुपती पारस यांनी राजीनामा देताना लोक जनशक्ती पार्टीवर एनडीएमध्ये अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली. तसेच आता पुढची भूमिका काय असेल? याबाबत लवकरच ठरवले जाईल, असे पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, भाजपाने लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिलेला आहे. त्यामुळे देशभरात छोट्या-मोठ्या पक्षांना भाजपा सोबत घेत बेरजेचे राजकारण करत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : राज ठाकरे महायुतीत येणार का? छगन भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट ही आहे की..”
मंत्री पशुपती पारस काय म्हणाले?
“लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील ‘एनडीए’च्या ४० जागाांसाठीच्या वाटपाची घोषणा काल झाली. याआधी पाच-सहा दिवसांपूर्वीही मी सांगितले होते, एनडीएच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत मी बोलणार नाही. पण काल अखेर जागावाटपाची घोषणा झाली. आमचा पक्ष जवळपास पाच वर्षांपासून ‘एनडीए’बरोबर होता. या काळात आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले. आजही मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. मात्र, आमच्या पक्षासह आमच्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आज मी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे”, असे पशुपती पारस यांनी सांगितले.
पशुपती पारस ‘राजद’च्या संपर्कात?
पशुपती पारस यांच्या पक्षाला एनडीएमध्ये एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तसेच पुढील भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले. मात्र, नाराज झालेले पशुपती पारस ‘राजद’च्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. २०१९ च्या निवडणुकीत हाजीपूर मतदारसंघातून ते खासदार झाले होते. यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. पण आता एनडीएतून बाहेर पडल्यानंतर पशुपती पारस पुन्हा हाजीपूरमधूनच निवडणूक लढण्याची शक्यता आहे.