ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात रेल्वे अपघाताची एक विचित्र घटना समोर आली आहे. झारसुगुडाहून संबलपूरकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वेनं आज सायंकाळी एका गाईला धडक दिली. या अपघातानंतर रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. एरवी अशाप्रकारे एखाद्या प्राण्याला रेल्वेनं धडक दिली तर संबंधित प्राण्याला दुखापत होते किंवा प्राण्याचा मृत्यू होतो. पण ओडिशातील या घटनेत चक्क रेल्वेचे डबे रुळावरून घसरले आहेत.
या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अपघाताची ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक बचाव पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होतं. तसेच अपघातग्रस्त रेल्वेचे डबे पुन्हा रुळावर चढवण्याचं काम सुरू आहे.
या घटनेत जीवितहानी अथवा जखमी झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून बचाव दलाकडून बचावकार्य सुरू असल्याचं दिसत आहे.