पुढच्या दोन वर्षात देशातल्या ८०० शहरांमध्ये पासपोर्ट मिळणे शक्य होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या सगळ्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या प्रमुख टपाल कार्यालयांमध्ये पासपोर्ट सेवा उपलब्ध करून देण्याची तरतूद केंद्रातर्फे करण्यात येणार आहे. यावर्षाच्या अखेरपर्यंत पासपोर्टसाठी १५० केंद्र उभारली जातील असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी म्हटले आहे.
तर येत्या दोन वर्षात देशातल्या ८०० शहरांमध्ये पासपोर्ट मिळण्याची सोय होणार आहे. मार्चमध्ये झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यासंदर्भातली घोषणा केली होती. देशातल्या ८०० शहरांमधल्या प्रमुख टपाल केंद्रांना पासपोर्ट अॅक्ट अंतर्गत पासपोर्ट उपलब्ध करून देण्याचे अधिकार दिले जाणार आहेत. लोकांना पासपोर्ट काढण्यासाठी दूर जावे लागू नये यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सद्यस्थितीत पासपोर्ट काढण्यासाठी देशातील नागरिकांना लांबचे अंतर कापून पासपोर्ट कार्यालय गाठावे लागते. हे टाळण्यासाठीच केंद्राने हा नवा निर्णय घेतला आहे.
सध्या टपाल कार्यालय आणि पासपोर्ट कार्यालय या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सोबत काम करत आहेत. देशातल्या प्रमुख शहरांमधल्या मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट केंद्र उभारले जाणार आहे. अनेक टपाल कार्यालयांमध्ये ही प्रक्रिया पूर्णही झाली आहे असेही सिंग यांनी म्हटले आहे.