Pastor Bajinder Singh : ‘येसू,येसू..फेम पाद्री बाजिंदर सिंगला बलात्कार प्रकरणात मोहाली न्यायालयाने दोषी ठरवलं असून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहाली न्यायालयाने आज (१ एप्रिल) हा निर्णय दिला आहे. गेल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती, तेव्हा बाजिंदर सिंगला २०१८ च्या झिरकपूर बलात्कार प्रकरणात दोषी ठरवलं होतं. मात्र, शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. यानंतर न्यायालयाने या संदर्भातील निर्णय देत बाजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हे प्रकरण २०१८ सालचं आहे. या प्रकरणातील पीडितेचं म्हणणं आहे की, ७ वर्षांपासून न्यायालय आणि पोलिसांकडे न्यायासाठी चकरा मारत होते. तसेच पीडितेने असाही दावा केला की तिच्यासारख्या इतर काही महिलांचं देखील बाजिंदर सिंगने शोषण केलं होतं. दरम्यान, या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

बाजिंदर सिंगला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “बाजिंदर सिंग तुरुंगातून बाहेर आल्यानंतर देखील तो असाच गुन्हा करू शकतो. त्याचं मानसिक संतुलन व्यवस्थित नाही. त्यामुळे तो तुरुंगातच राहावा असं मला वाटतं. आज अनेक पीडित मुली जिंकल्या आहेत. मात्र, आमच्यावर हल्ल्याची शक्यता असल्याने मी डीजीपींना आमची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती करते.”, असं पीडितेने म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणातील पीडितेच्या वकिलांनी म्हटलं की, “न्यायालयाने बाजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आता त्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. फाशीनंतरची ही सर्वात मोठी शिक्षा आहे. बाजिंदर सिंग हा लोकांना आपली जादू दाखवून मूर्ख बनवत असयाचा. मात्र, लोकांनाही आता यातून काही समज येईल. तसेच बाजिंदर सिंगने आपल्याला कमी शिक्षा व्हावी असं आवाहन केलं होतं, पण न्यायालयाने ते मान्य केलं नाही”, असं पीडितेच्या वकिलांनी म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

एका महिलेने २०१८ मध्ये मोहालीच्या झिरकपूर पोलीस ठाण्यात बाजिंदर सिंगविरोधात तक्रार दाखल केली होती. पीडितेने फिर्यादीत म्हटलं होतं की, बाजिंदर सिंगने तिला परदेशात नेण्याचं आश्वासन देऊन तिचं शोषण केलं. तसेच घटनेचा व्हिडीओ बनववून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला होता. दरम्यान, यानंतर २०१८ मध्ये पीडितेने पोलिसांत बाजिंदर सिंगविरोधात लैंगिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.