महिलेच्या घरावर अवैधरित्या बुलडोझर चालवल्याप्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना चांगलेच सुनावले आहे. न्यायमूर्ती संदीप कुमार यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त करत अशा प्रकारे कोणाच्याही घरावर बुलडोझर चालवणार का? अशी विचारणा त्यांनी बिहार पोलिसांना केली आहे. तसेच याप्रकरणी अगमकुआच्या पोलीस अधिक्षक अंचल अधिकारी यांना ८ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा – अपत्य नियंत्रणाची शिफारस; समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड सरकारच्या समितीचा अहवाल
नेमकं काय आहे प्रकरण?
१५ ऑक्टोबर रोजी याचिकाकर्त्या सहयोग देवी यांच्या घरावर पोलिसांनी अवैधरित्या बुलडोझर चालवले होते. याप्रकरणी त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २४ नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती संदीप कुमार यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी पार पडली. दरम्यान, या सुनावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत न्यायालयाने बिहार पोलिसांना फटकारल्याचे दिसून आले.
हेही वाचा – ‘काश्मीर फाइल्स’चा वाद; ‘इफ्फी’च्या तीन परीक्षकांचा लापिड यांना पाठिंबा
न्यायालयाने नेमकं काय म्हटलं?
“तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का? अशी कोण व्यक्ती आहे, ज्याच्या इशाऱ्यावर तुम्ही थेट घरावर बुलडोझर चालवता? तुम्ही नेमकं कोणाचं प्रतिनिधित्व करता? राज्य सरकारचे की खासगी व्यक्तीचे? संपूर्ण यंत्रणेचा तमाशा बनवून ठेवला आहे”, अशा शब्दांत न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले आहे.
“भूमी विवादांची प्रकरणंही आता पोलीस ठाण्यातून निकाली निघणार आहेत का? कोणीही येईल, लाच देईल आणि पोलीस त्यांच्या घरावर बुलडोजर चालवेल? त्यापेक्षा मग दिवाणी न्यायालयं बंद का करत नाहीत?” असेही ते म्हणाले.
हेही वाचा – रेल्वे रुळावर फेकलेले साहित्य गोळा करायला गेलेल्या भाजीविक्रेत्याला रेल्वेने दिली धडक, दोन्ही पाय निकामी
दरम्यान, याचिकाकर्त्यांवर जमीन खाली करण्यासाठी दबाव आणत खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केल्यानंतर यावरूरनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याप्रकरणात सहभागी पोलीस अधिकारी आणि सीईओ यांना प्रत्येकी पाच लाख दंड ठोठावणार असल्याचेही ते म्हणाले.