Patanjali Red Chilli Powder Refund : झपाट्याने वाढणारी ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी पतंजली फूड्सने बाजारातून चार टन लाल मिरची पावडर (२०० ग्रॅम पॅक) परत मागवली आहे. याबाबत पतंजली फूड्सकडून शुक्रवारी माहिती देण्यात आली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे राष्ट्रीय अन्न नियामक, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) कंपनीला चार टन लाल मिरची पावडर परत मागवण्याचे आदेश दिले होते. यानंतर पतंजली फूड्सने लाल मिरची पावडरचे २०० ग्रॅमचे पाकेट परत करून ज्या दुकानातून ते घेतले आहे, तेथून पैसे माघारी घ्यावेत असे आवाहन ग्राहकांना केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे कंपनीचे म्हणणे?

पतंजली मिरची पावडरचा उत्पादनाचा नमुना तपासला असता, त्यामध्ये मर्यादेपेक्षा अधिक कीटकनाशकांचा वापर केल्याचे आढळले होते. “एफएसएसएआयने लाल मिरची पावडरसह विविध अन्नपदार्थांसाठी कीटकनाशकांच्या वापरासाठी मर्यादा निश्चित केली आहे”, असे पतंजली फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव अस्थाना यांनी एका निवेदनात सांगितले आहे. अस्थाना पुढे म्हणाले की, “एफएसएसआयच्या आदेशानंतर आम्ही आमच्या वितरण व्यवस्थेला याबाबत माहिती दिली असून, याप्रकरणी ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिराती जारी केल्या आहेत. तसेच आम्ही चार टन लाल मिरची पावडरची (२०० ग्रॅम पॅक) एक बॅच परत मागवली आहे.”

दरम्यान गेल्या वर्षी, एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन मसाले उत्पादकांच्या काही नमुन्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे अंश आढळल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर हाँगकाँगने एमडीएच आणि एव्हरेस्टच्या काही उत्पादनांची विक्री थांबवली होती.

भारतातील आघाडीची ग्राहकोपयोगी वस्तू कंपनी पतंजलीची स्थापना १९८६ मध्ये बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील झाली होती. पतंजली फूड्सचे पूर्वीचे नाव रुची सोया असे होते. ही कंपनी खाद्यतेल, अन्न आणि ग्राहकोपयोगी वस्तूंचे उत्पादन करते. त्यांची उत्पादने पतंजली, रुची गोल्ड, न्यूट्रेला इत्यादी विविध ब्रँडच्या माध्यमातून विकली जातात.

पतंजलीला ३०० कोटी रुपयांचा नफा

सप्टेंबर तिमाहीत पतंजली फूड्सचा निव्वळ नफा २१ टक्क्यांनी वाढून ३०८.९७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा २५४.५३ कोटी रुपये होता. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून ८,१९८.५२ कोटी रुपये झाले आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत ७,८४५.७९ कोटी रुपये होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patanjali foods red chilli powder recall product food safety refund aam