दिल्लीतल्या एका लीगल फर्मने योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीला कायदेशीर नोटीस धाडली आहे. पतंजलीचं उत्पादन असलेल्या दिव्य दंतमंजन या दात घासण्याच्या पावडरवर व्हेज असल्याचं हिरवं लेबल आहे. मात्र या पावडरमध्ये Cuttlefish च्या हाडांची भुक्टी असल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे. मांसाहारी घटक वापरुन दंत मंजन तयार करण्यात आलं आहे आणि त्यावर Veg चं लेबल लावण्यात आलं आहे. ग्रीन मार्क दिला गेला आहे असं म्हणत ही नोटीस बजावण्यात आली आहे.
शाशा जैन यांनी धाडली नोटीस
दिल्लीत वकील म्हणून कार्यरत असलेल्या वकील शाशा जैन पतंजलीला नोटीस धाडली आहे. शाशा जैन यांनी आपल्या नोटीससह सगळे दस्तावेजही जोडले आहेत. या दस्तावेजात त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलं आहे की दिव्य दंतमंजन शाकाहारी आहे असं म्हटलं गेलं आहे. त्यावर हिरव्या रंगाची निशाणीही लावली आहे. मात्र ‘दिव्य दंत मंजन’ यामध्ये Samudra Fen वापरण्यात आलं आहे. ग्राहकांची ही शुद्ध फसवणूक आहे. लेबलिंग नियमांचं पतंजलीने उल्लंघन केलं आहे असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे. ‘द प्रिंट’ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
शाशा जैन यांनी असंही म्हटलं आहे की माझ्या कुटुंबातले काही सदस्य, काही परिचयाचे लोक दिव्य दंतमंजन वापरताता. मात्र या दंत मंजनात Cuttlefish सारखे मांसाहारी घटक वापरले आहेत. हे समजल्यानंतर त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. पतंजलीकडून याबाबत स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता उत्पादनांवर विश्वास कसा ठेवायचा असंही त्यांनी विचारलं आहे.
शाशा जैन यांनी पतंजलीला जी नोटीस धाडली आहे त्यामध्ये पुढच्या १५ दिवसांमध्ये उत्तर द्यावं असंही म्हटलं आहे. तसंच उत्तर दिलं नाही किंवा योग्य स्पष्टीकरण दिलं नाही तर आम्ही कायेदशीर कारवाई करु असाही इशारा दिला आहे.