प्रत्येकाच लक्ष करोनावरील औषधाकडे लागलेलं असताना बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं मागील आठवड्यात करोनावर औषध शोधल्याचा दावा केला. इतकंच नाही, तर त्यांनी हे औषध बाजारातही आणलं. मात्र, औषधावर आक्षेप घेत केंद्र सरकारपासून ते उत्तराखंड सरकारनं पतंजलीच्या औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. उत्तराखंड आयुष विभागानं नोटीस जारी केल्यानंतर पतंजलीनं करोनावरील औषध बनवल्याच्या दाव्यावरून यू-टर्न घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोनानं देशात थैमान घातलं आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे करोनावर औषध विकसित करण्यासाठी रात्रंदिवस संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडं बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं गेल्या आठवड्यात करोनावर औषध शोधल्याचा दावा केला. कोरोनिल नावाचं औषध पतंजलीनं लॉन्च केलं. केंद्रीय आय़ुष मंत्रालयानं औषधाच्या जाहिरातीवर बंदी आणत औषधाच्या चाचण्या सुरू केल्या.

पतंजलीचं औषध जगासमोर आल्यानंतर उत्तराखंड आय़ुष विभागानं परवानगी दिली नसल्याचं सांगितलं. तसंच पतंजलीला नोटीसही जारी केली होती. या नोटिसीला अखेर पतंजलीकडून उत्तर देण्यात आलं आहे. यासंदर्भात हिंदी माध्यमांनी वृत्त दिलं आहे. नोटिसीला उत्तर देताना पतंजलीनं करोनावर औषध बनवल्याचा दाव्यावरून कोलांटउडी घेतली आहे. करोना बरं करणार कोणतंही औषध बनवले नसल्याचं पतंजलीनं म्हटलं आहे.

पतंजलीनं औषध बाजारात आणल्यानंतर उत्तराखंड आयुष विभागानं करोनावर औषध बनवण्याची परवानगी दिली नव्हती असा खुलासा केला होता. पतंजलीनं केवळ ताप, खोकला व प्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध बनवण्यासाठी परवानगी घेतली होती. त्यांच्या अर्जात करोनाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे पतंजलीला नोटीस पाठवू, असं उत्तराखंड आयुष विभागाच्या परवाना अधिकाऱ्यानं म्हटलं होतं. त्यानंतर २४ जून रोजी पतंजली दिव्या फार्मसीला नोटीस बजावण्यात आली होती. सध्या केंद्र सरकारनं करोनाची जाहिरात व विक्री बंद केली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालय या औषधाच्या चाचण्या घेत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patanjali takes uturn on coronavirus medicine coronil bmh