योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली देशी तुपाच्या उत्पादनांमध्ये बुरशी आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्नसुरक्षा खात्याने त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
पतंजली देशी तुपाच्या बरणीत बुरशी सापडल्याची तक्रार आली होती. त्यानंतर हे नमुने गोळा करून रुद्रपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. यापूर्वी पतंजलीच्या मोहरी तेल, मध, बेसन, काळी मिरी पूड या उत्पादनांमध्येही भेसळ असल्याच्या तक्रारी आल्या होत्या आणि त्याचे नमुने तपासणीत दोषयुक्त असल्याचे निष्पन्न झाले होते. अन्नसुरक्षा विभागाने २७ नोव्हेंबरला पतंजलीच्या आटा नूडल्सचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले होते. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.
पतंजली उत्पादनांविरोधात मुस्लीम संघटनेचा फतवा
चेन्नई- रामदेव बाबा यांच्या पतंजली संस्थेने उत्पादित केलेल्या उत्पादनांमध्ये गोमूत्र वापरलेले असते. मुस्लीम धर्मानुसार ही कृती निषिद्ध असून त्या उत्पादनांचा वापर करू नये असा फतवा तामिळनाडू थोहिद जमात या संघटनेने काढला आहे. मुस्लीम लोकांना या उत्पादनांमध्ये काय असते याची माहिती नसल्याने हा फतवा जारी करण्यात येत आहे असे संघटनेने म्हटले आहे.