आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीयांना १० टक्के आरक्षण देण्याचा गुजरात सरकारने घेतलेला निर्णय मान्य करावयाचा की नाही हे पटेल समाजाने ठरवायचे आहे, ते मी ठरविणार नाही, असे पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने म्हटले आहे.
पाटीदार अनामत आंदोलन समितीचे निमंत्रक निखिल सवानी यांना हार्दिक पटेल याने कारागृहातून पत्र पाठविले आहे. पटेल समाजाला आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गातून आरक्षण हवे आहे की अन्य मागासवर्गातून आरक्षण हवे आहे हे पटेल समाजाने ठरवावे, असे हार्दिक पटेल याने पत्रात म्हटले आहे.
आमच्या समाजाच्या हिताचा बळी देऊन आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही, त्यामुळे मी नव्हे तर पटेल समाजाने निर्णय घ्यावयाचा आहे, असेही हार्दिकने म्हटले आहे. आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गापेक्षा अन्य मागासवर्गातील आरक्षण उत्तम आहे, असे समाजाला वाटत असेल तर आम्ही अन्य मागासवर्गातून आरक्षणासाठी लढा देऊ, मात्र आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गातील आरक्षण योग्य वाटले तर ते मान्य करू, असे हार्दिकने म्हटले आहे.