सरदार वल्लभभाई पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते, तर देशाचे चित्र आज वेगळे दिसले असते, असे मत भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले. 
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी हे दोघेही मंगळवारी एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मोदी यांनी पटेल यांचे विचार आणि धोरणावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता वल्लभभाई पटेल यांच्याकडे होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याऐवजी पटेल यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनण्याची संधी मिळायला हवी होती. तसे झाले असते, तर देशाचे चित्र आज वेगळे दिसले असते.