सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याखाली अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या खाली पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणण्याबाबत दिलेला आदेश कोरला जावा, जशी टीकात्मक टिपण्णी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केली आहे.

शर्मा माध्यमांशी बोलताना म्हणाले, सरकारने जर असे केले तर लोकांना हे कळेल की देशाचे पहिले गृहमंत्री संघाबाबत काय विचार करीत होते. संघ आणि भाजपाला स्वतःचे नायक नाहीत. त्यामुळेच ते सरदार पटेल यांचा भव्य ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारत आहेत. या भव्य पुतळ्याची निर्मिती भारतात नव्हे तर चीनमध्ये करण्यात आली आहे.

महात्मा गांधींच्या हत्येनंतर पटेल यांनी रा. स्व. संघावर बंदी घालण्याबाबतचा लिखित आदेश काढला होता. या आदेशाला पटेल यांच्या पुतळ्याखाली लावायला हवे, कारण त्यामुळे देशाला पटेल यांचे संघाबाबतचे विचार कळतील, असे शर्मा यांनी संघाचे नाव न घेता म्हटले आहे.

दरम्यान, शर्मा यांनी राफेल डील प्रकरणावर बोलताना आरोप केला की, हा व्यवहार कोणाला कळू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर तो झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या व्यवहारातील सर्व फाइल्स आणि यासंबंधीच्या नोटीशींवर कोर्टाचे सील लावण्याची मागणी सुप्रीम कोर्टाकडे करीत आहोत.

Story img Loader