इतर मागासरवर्गीय प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे, यासाठी गुजरातमधील पटेल समाजाने आपले आंदोलन आणखी तीव्र केले असून, त्याचाच एक भाग म्हणून काही गावांतील लोकांनी एका सहकारी बॅंकेत ठेवलेल्या ठेवी काढण्यास सुरुवात केली आहे. या बॅंकेतून एका दिवसांत २० लाख रुपये काढण्यात आले आहेत. आंदोलकांनी राजकीय नेत्यांविरूद्धही तीव्र संताप व्यक्त केला असून, त्यांना गावामध्ये येण्यास बंदी घातली आहे.
आरक्षणासाठी काही दिवसांपूर्वीच पटेल समाजाने हार्दिक पटेल याच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सूरत, वडोदरा, अहमदाबादसह अनेक ठिकाणी संचारबंदीही लावण्यात आली होती. यावेळी अनेक आंदोलकांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले होते. या आंदोलनावेळी पटेल समाजातील राजकीय नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा न दिल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
सरदार पटेल ग्रुप या संघटनेने केलेल्या आवाहनानंतर पटेल समाजातील काही लोकांनी सांबरकांथा जिल्हा सहकारी बॅंकेतून आपल्या ठेवी काढण्यास सुरुवात केली. सोमवारी एका दिवसात २० लाख रुपयांच्या ठेवी या बॅंकेतून काढण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पटेल समाजाच्या आंदोलनावेळी गुजरात सरकारने मोबाईल इंटरनेटवर घातलेली बंदी योग्य असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यासंदर्भात दाखल करण्यात आलेली एक जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.