पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या तळावर सुरक्षा दलाचे आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे सात जवान शहीद झाले. पण दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना शहीद झालेल्या जगदीश सिंह या भारतीय जवानाची शौर्य गाथा देशातील प्रत्येकासाठी अभिमानास्पद ठरणारी आहे.
पठाणकोट हवाई तळाचे कमांडिंग अधिकारी जे.एस धमून यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सीमेत दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहिम सुरू करण्यात आली होती. शोध मोहिम सुरू असतानाच पठाणकोट परिसरात दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत तीन जवान शहीद झाले. त्यानंतर दहशतवादी खुल्या मैदानात गेले. डीएससी जवान जगदीश सिंह यांनी दहशतवाद्यांच्या मागे धाव घेतली आणि एकाला पकडले. दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली आणि तेवढ्यातच जगदीश यांनी दहशतवाद्याचीच बंदूक हिसकावून त्याला कंठस्नान घातले. यानंतर जगदीश यांनी उर्वरित दहशतवाद्यांचा पाठलाग सुरू केला. मात्र, दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत त्यांना वीरमरण आले.
दरम्यान, पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळाजवळ गेल्या ५० तासांपेक्षा जास्त वेळेपासून भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री अजूनही सुरू आहे. काही तासांपूर्वी हवाई दलाच्या तळावर मोठा स्फोट झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाचवा दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

Story img Loader