पठाणकोट येथील हवाई तळावर हल्ला होण्यापूर्वी दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा दावा करणारे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग सोमवारी चौकशीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुख्यालयात हजर झाले. एनआयएकडून पठाणकोट हल्ल्ल्यासंदर्भात सिंग यांची चौकशी करण्यात येईल. एनआयएने शुक्रवारी सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला होण्यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी दहशतवाद्यांनी सलविंदर यांच्या एसयूव्ही वाहनासकट त्यांचे अपहरण केले होते. मात्र, काही वेळाने दहशतवाद्यांच्या तावडीतून पलायन करण्यात सलविंदर यांनी यश मिळवले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, सलविंदर सिंह यांनी सुटकेनंतर दिलेल्या जबानीत तफावत आढळल्याने त्यांची पुन्हा पुन्हा चौकशी करण्यात येत आहे.
याशिवाय, काही दिवसांपूर्वीच सलविंदर सिंग यांच्यावर पाच महिला पोलिसांनी लैंगिक छळवणुकीची तक्रार केली असून, त्यांच्याविरोधात चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली होती. गुरुदासपूर येथे काम करीत असताना सलविंदर हे सलगीने वागत होते व गलिच्छ शेरेबाजी करीत होते अशी तक्रार महिला पोलिसांकडून करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी अपहरण केल्याचा जो दावा त्यांनी केला आहे, त्याच्या दोन दिवस अगोदर सिंग यांची बदली जालंधर येथे पंजाब सशस्त्र दलाच्या ७५ व्या बटालियनचे सहायक कमांडंट म्हणून झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा