३६ तासांनंतर चकमक संपली, हवाई तळाची तपासणी सुरूच
पठाणकोट येथे हवाई तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा मुकाबला करण्याच्या मोहिमेत काही उणिवा राहून गेल्या अशी कबुली संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी आज दिली. या हल्ल्यात सामील असलेले सहा घुसखोर दहशतवादी मारले गेले असून आता तेथे एकही दहशतवादी उरलेला नाही असे आता तरी वाटते आहे, पण सगळी तपासणी पूर्ण होईपर्यंत तसे आपण ठामपणे म्हणू शकत नाही, चकमक संपली असली तरी या परिसराची तपासणी स्फोटकांच्या दृष्टिकोनातून चालू आहे. दहशतवाद्यांनी पाकिस्तानी बनावटीची शस्त्रे व उपकरणे वापरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हवाई तळाला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, शनिवारी पहाटे ३.३० वाजेपासून ३६ तास ही मोहीम सुरू होती, पण तपास मोहीम अजून चालू आहे. आता तरी एकही संशयित दहशतवादी तेथे नाही. उद्यापर्यंत हवाई तळ व परिसराची तपास मोहीम पूर्ण होईल. जे सुरक्षा कर्मचारी या हल्ल्यात मरण पावले त्यांना हुतात्मा गणले जाईल व युद्धातील वीरजवानांप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात येतील. दहशतवाद्यांकडे ४०-५० किलो वजनाची शस्त्रे होती. त्यात बंदुकीच्या गोळ्या, तोफगोळे यांचा समावेश होता. ग्रेनेड लाँचरही त्यांच्याकडे होते.
एका प्रश्नावर त्यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना काही उणिवा राहिल्या हे मला मान्य आहे, पण देशाच्या सुरक्षेवर तडजोड केलेली नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर सगळ्या बाबी स्पष्ट होतील व सुरक्षा तपशिलावर जाहीरपणे चर्चा करता येणार नाही.
किमान २४ कि. मी. चा परिघ असलेल्या २००० एकराच्या हवाईतळावर दहशतवादी आत कसे येऊ शकले ही बाब मलाही चिंतेची वाटते असे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या संबंधांबाबत ते म्हणाले की, त्यातील शस्त्रे व उपकरणे पाकिस्तानातील होती. गरुड कमांडोशिवाय कुणीही थेट मोहिमेत हुतात्मा झालेले नाही. डिफेन्स सिक्युरिटी कोअरचे पाच जवान दुर्दैवाने मरण पावले. त्यातील जगदीश चंद्र याने दहशतवाद्याशी झुंजही दिली होती, त्यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केला आहे.
दहशतवाद्यांच्या विरोधातील ही मोहीम अवघड होती. तरीही मालमत्ता व कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सुरक्षित आहेत. ज्या इमारतीत दहशतवादी लपले होते त्या इमारतीचे नुकसान झाले आहे. लष्कर, हवाई दल व नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (एनएसजी) यांनी संयुक्तपणे जो लढा दिला तो कौतुकास्पद आहे. यापुढे या दलांना संयुक्त प्रशिक्षण दिले जाईल. मोहिमेत एनएसजीची भूमिका प्रमुख ठेवल्याबाबत टीका होत आहे त्यावर विचारले असता त्यांनी सांगितले की, एनएसजी मधील ५० टक्के कमांडो हे लष्करातूनच आलेले असतात. त्या हवाई तळाजवळ तीन हजार कुटुंबे राहतात शिवाय पाच ते सहा देशातील प्रशिक्षक राहतात तसेच इमारती, हेलिकॉप्टर्सही आहेत त्यांचे रक्षण करण्यात आले. सीमा सुरक्षा दलाच्या अपयशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, दहशतवादी कोठून घुसू शकतात याती माहिती द्यावी, असा आदेश आधीच दिलेला होता. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयए या प्रकरणी तपास करीत आहे, पण त्याचा तपशील आपण सांगणार नाही. सर्व सुरक्षा आस्थापनांची सुरक्षा पाहणी केली जात आहे.
घटनास्थळी पाच जिवंत बॉम्ब सापडले त्यामुळे दहशतवाद्यांचे मृतदेह शोधण्यात वेळ लागला. सहाव्या दहशतवाद्याचा मृतदेह अजून मिळालेला नाही. आम्ही जोखीम घेऊ शकत नाही, स्फोटकांमुळे आम्ही एक अधिकारी गमावला आहे त्यामुळे आणखी प्राणहानी होऊ देणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवाद्यांनाअमली पदार्थ तस्करी टोळ्यांची मदत
नवी दिल्ली -पठाणकोट येथील हवाई तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यात दोन्ही बाजूच्या अमली पदार्थ टोळ्यांनी मदत केली असण्याची शक्यता आहे. शिवाय, दहशतवाद्यांनी वापरलेली शस्त्रास्त्रे ही हल्ल्याच्या आधीच पाठवण्यात आली होती असे समजते. सुरक्षा संस्थांच्या संशयानुसार दहशतवाद्यांनी पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा पार केली त्यात खोटे भारतीय चलन, शस्त्रास्त्रे व अमली पदार्थ यांचा व्यापार करणाऱ्या टोळ्यांची मदत असावी. तस्करी करणाऱ्या टोळ्यांशी सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी कुणाचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या टोळ्यांमधील काही जणांचे जाबजबाब घेतले तर या कटाचा पर्दाफाश होऊ शकतो. शस्त्रास्त्रे व दारूगोळा हा पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय सीमेवरून आधीच पाठवण्यात आला होता. अमली पदार्थ टोळ्यांच्या मार्फत शस्त्रास्त्रे पाठवण्यात आली व नंतर ती विशिष्ट ठिकाणी लपवण्यात आली, सीमा ओलांडल्यानंतर दहशतवाद्यांनी ती पुन्हा ताब्यात घेतली. तस्कर ज्या मार्गाने येतात त्याच मार्गाने दहशतवादी आले, त्यामुळे पंजाबमधील अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांची कसून चौकशी करण्याची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले.