पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यात पाकिस्तानी यंत्रणांचा हात उघड होत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मंगळवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला. या हल्ल्याबाबत भारताने पुरविलेल्या ठोस माहितीनुसार योग्य ती कारवाई तातडीने करण्यात येईल, अशी ग्वाही शरीफ यांनी मोदी यांना दिली. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दलही शरीफ यांनी शोक व्यक्त केला. उभय देशांतील चर्चेला खीळ घालण्यासाठी अतिरेकी ही कृत्ये करीत असून उभय देश संघटितपणे दहशतवादाचा मुकाबला करतील, यावर शरीफ व मोदी यांचे एकमत झाल्याचे वृत्त ‘रेडिओ पाकिस्तान’ने दिले. तर मोदी यांनी शरीफ यांच्याकडे तातडीच्या कारवाईसाठी आग्रह धरत त्यांना खडसावल्याचे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. पठाणकोट प्रकरणी पाकिस्तानने त्यांच्या देशातील दोषींवर कारवाई करावी, अशी अपेक्षा अमेरिकेनेही व्यक्त केली आहे.
दरम्यान, या हल्ल्याचा मुकाबला करण्याच्या मोहिमेत काही उणिवा राहून गेल्या अशी कबुली संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी मंगळवारी दिली. या हल्ल्यात सामील असलेले सहा दहशतवादी मारले गेले असून आता तेथे एकही दहशतवादी उरलेला नाही असा अंदाज आहे, पण चकमक संपली असली तरी या परिसराची तपासणी स्फोटकांच्या दृष्टिकोनातून सुरू आहे.