पठाणकोट हल्ल्याचा तपास
पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानचे विशेष तपास पथक (एसआयटी) भारतात येणार असले, तरी अद्याप त्यांच्याकडून व्हिसासाठीचे अर्ज प्राप्त झाले नसल्याची माहिती भारत सरकारच्या सूत्रांनी दिली.
पाकिस्तानच्या विशेष तपास पथकाकडून अद्याप व्हिसासाठी अर्ज आलेले नाहीत, त्यामुळे त्यांना व्हिसा देण्याचा प्रश्न सध्या उपस्थित होऊ शकत नाही, असे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानच्या तपास पथकाकडून व्हिसासाठीचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. पाकिस्तानच्या तपास पथकाला भारताने व्हिसा मंजूर केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्याच्या पाश्र्वभूमीवर वरील स्पष्टीकरण करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानचे विशेष तपास पथक लवकरच भारताच्या दौऱ्यावर येईल, असे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझिझ यांनी बुधवारी येथे सांगितले होते. तपास पथक भारतात कधी येणार असे विचारले असता अझिझ यांनी लवकरच, असे उत्तर दिले.
पठाणकोट हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक पाठविण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचे परराष्ट्र मंत्रालयाने स्वागत केले आहे. परदेशातून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाटेत लाहोरचा दौरा केला होता. त्यानंतर पठाणकोट हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा पुढे ढकलण्यात आली होती. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि सरताज अझिझ यांच्यातील चर्चेच्या वेळी या प्रश्नावरही चर्चा करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा