तपासात कोणतीही प्रगती नाही, शरीफ यांचे आश्वासन अद्याप हवेतच
पठाणकोट हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा तपास लवकरच पूर्ण केला जाईल आणि अहवाल जाहीर केला जाईल, असे अवघ्या तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी जाहीर केले असताना पाकिस्तानने आता भारताकडे या हल्ल्यासंदर्भात आणखी पुराव्यांची मागणी केल्याने पाकिस्तान या तपासाबाबत कितपत गंभीर आहे हे अधोरेखित झाले आहे.
पठाणकोट हल्ल्याचा पाकिस्तानात तपास सुरू असून त्यामध्ये कोणतीही प्रगती होत नसल्याने भारताकडे आणखी पुरावे मागण्यात येणार असल्याचे या घडामोडींची इत्यंभूत माहिती असणाऱ्या सूत्रांनी सोमवारी सूचित केले.
तपासात कोणतीही प्रगती होत नसल्याने आम्हाला आणखी पुराव्यांची गरज असल्याचा कांगावा करीत पाकिस्तानने चेंडू पुन्हा भारताच्या कोर्टात ढकलला आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या हल्ल्याचा तपास करण्यासाठी पाकिस्तानने सहा जणांचे एक पथक स्थापन केले आहे. भारताकडून आणखी पुरावे मिळण्याची गरज आहे, असे या पथकाने परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रांत म्हटले आहे. पाकिस्तानातून भारतात करण्यात आलेल्या पाच भ्रमणध्वनी क्रमांकांबाबतचा तपास पथकाने जवळपास पूर्ण केला आहे. हे क्रमांक भारत सरकारने पाकिस्तानला उपलब्ध करून दिले होते.
या क्रमांकावरून हल्ल्याच्या तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही कारण त्या क्रमांकांची नोंदणी करण्यात आलेली नव्हती आणि ते बनावट ओळखपत्राच्या आधारे मिळविण्यात आले होते. त्यामुळेच तपासात प्रगती होत नसल्याने अधिक पुराव्यांची गरज आहे, सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या बाबत भारताशी चर्चा करावी अशी विनंती आम्ही पत्राद्वारे सरकारला केली आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. पठाणकोट हवाई दलाच्या तळावर २ जानेवारी रोजी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्वरेने विशिष्ट माहिती पुरविली होती.
बंदी घालण्यात आलेल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याच्यासह अन्य संशयितांबाबतचे काय, असे विचारले असता सूत्रांनी सांगितले की, प्रथम भारताकडून पुरावे येऊ द्या. पंजाबच्या दहशतवादविरोधी विभागाचे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक राय ताहीर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी पथक स्थापन करण्यात आले आहे. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा हात असल्याचे भारताने म्हटले असून त्याची चौकशी करण्यास शरीफ यांनी सांगितले आहे.

Story img Loader