पठाणकोटमधील हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतात आलेल्या पाकिस्तानच्या पाच सदस्यीय पथकाने मायदेशात परतल्यावर तारे तोडले आहेत. पाकिस्तानची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करण्यासाठी भारताने पठाणकोटवरील हल्ल्याचा बनाव रचला होता, असा अहवाल या पथकाकडून लवकरच पाकिस्तानी सरकारला सादर करण्यात येणार आहे. ‘पाकिस्तान टुडे’ या वृत्तपत्रामध्ये या अहवालाबद्दल वृत्त छापून आले आहे. या हल्ल्याबद्दल आणि दहशतवाद्यांबद्दल भारतीय अधिकाऱ्यांना आधीपासूनच माहिती होती, असेही या अहवालात लिहिण्यात आले आहे.
पठाणकोट हल्ल्याच्या तपासकामात सक्रिय सहभाग असलेल्या मोहम्मद तंझील अहमद या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल २४ गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. त्याचा उल्लेख करून पठाणकोट हल्ल्याचा तपास दडपण्यासाठीच तपास अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली, असाही गंभीर आरोप पाकिस्तानी तपास पथकातील एका अधिकाऱ्याने केला आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची प्रतिमा जास्तीत जास्त मलिन होण्यासाठीच पठाणकोटमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास तीन दिवसांचा वेळ लावण्यात आला. जेणेकरून संपूर्ण जगाचे लक्ष या हल्ल्याकडे वेधले जाईल, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
पठाणकोट येथे दोन जानेवारीला लष्कराच्या हवाई तळावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात तपासासाठी पाकिस्तानचे पाच सदस्यीय पथक येथे आले होते, त्यात आयएसआयच्या एकाचा समावेश होता. या पथकाने हवाई तळाला भेट दिली. दहशतवाद्यांनी भिंती ओलांडून प्रवेश करताना हवाई तळावर हल्ला केला होता तेथेच वेगळे प्रवेशद्वार आता केले आहे. पाकिस्तानी पथकाने दहशतवादी हल्ल्याच्या प्रकरणात देशाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा