पठाणकोट हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असतानाच सोमवारी मोहाली येथे पोलिसांनी तिघाजणांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे. ही शस्त्रे पाकिस्तानी आणि चिनी बनावटीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांनी पठाणकोट हल्ल्यामुळे मंगळवारपासून सुरू असलेल्या नियोजित चीन दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पठाणकोटमधील भारतीय हवाई दलाच्या तळाजवळ गेल्या ५० तासांपेक्षा जास्त वेळेपासून भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. काही तासांपूर्वी हवाई दलाच्या तळावर मोठा स्फोट झाला होता. त्यानंतर भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाचवा दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. याठिकाणी दोन अतिरेकी दबा धरून बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता भारतीय सुरक्षा दलाचे जवान उर्वरित एका अतिरेक्याचा शोध घेत आहेत.
तत्पूर्वी हवाई दल आणि एनएसजीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेऊन पठाणकोट येथे सुरू असलेल्या लष्करी कारवाईबद्दलची माहिती दिली. याठिकाणी दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई अजूनही सुरू आहे. या हवाई तळावर असणारी भारतीय लष्कराची विमाने आणि अन्य साधनसामुग्री सुरक्षित आहेत. हवाई दलाच्या तळाचा प्रत्येक कोपरा तपासल्यानंतच हे ऑपरेशन संपल्याची घोषणा करण्यात येईल, असे एनएसजीच्या मेजर जनरल दुष्यत सिंग यांनी सांगितले. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘७ रेसकोर्स रोड’ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली.
गेल्या शनिवारी पठाणकोटमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. या संपूर्ण परिसराला लष्करी छावणीचेच स्वरुप आले आहे. पठाणकोटमधील हल्ल्यात शनिवारी शहीद झालेले एनएसजीचे लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार यांचे पार्थिव सोमवारी विशेष विमानाने बंगळुरूला आणण्यात आले. बंगळुरूमधील अनेक लोक निरंजन कुमार यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. निरंजन कुमार यांच्या कुटुंबीयांना यावेळी शोक अनावर झाला.
पंजाबमध्ये पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या तळावर शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवस शोधमोहीम सुरू आहे. या परिसरात आणखी दोन दहशतवादी जिवंत असल्याचे रविवारी दुपारी स्पष्ट झाले आणि त्यांच्याबरोबर सुरक्षा दलांची पुन्हा चकमक सुरू झाली. मोहीम लांबल्याने लष्कराने या परिसरात आणखी कुमक मागवली होती. रविवारपर्यंत सुरक्षा दलाचे ७ सदस्य शहीद झाले आणि ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. शहीद झालेल्यांमध्ये गरुड कमांडो दलाचा एक सदस्य आणि डिफेन्स सिक्युरिटी कोअरच्या ५ जवानांचा समावेश आहे.
मोहालीत शस्त्रसाठ्यासह तिघांना अटक, पठाणकोटमध्ये पाचवा अतिरेकी ठार
दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-01-2016 at 11:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pathankot operation still on toll mounts to